राज्य

मुंबई – हैदराबाद बुलेट ट्रेनला विरोध नाही मात्र मोबदला योग्य  हवा, जागा बाधित होणार्‍या शेतकर्‍यांची भूमिका


पंढरपूर –  मुंबई- हैद्राबाद बुलेट ट्रेन प्रकल्प राबविण्याचा चंग हायस्पीड रेल्वे कार्पोरेशनने बांधला असून याचे हवाई व नंतर आता सामाजिक सर्व्हेक्षण सोलापूर जिल्ह्यात सुरू झाले आहे. या जिल्ह्यातील 62 गावांमधून ही रेल्वे धावणार आहे. यासाठी बाधित होणार्‍या जागेसाठी किमान गुंठ्याला पाच ते सहा लाख रूपयांहून अधिकची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. याबाबत बुलेट ट्रेन जागा बाधित शेतकरी संघर्ष समिती गठित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
मुंबई, पुणे, सोलापूर, कलबुर्गी जिल्हा व नंतर तेलंगणा असे 721 किलोमीटरचे अंतर असणारा हा मार्ग असून यास रेल्वे विभागाने मंजुरी दिली आहे. याचे सर्व्हेक्षण मोनार्च कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे. यापूर्वी हवाई सर्व्हे देखील झाला आहे. आता सामाजिक सर्व्हेक्षणाचे काम सुरू आहे. पंढरपूर तालुक्यातही याचे अधिकारी व कर्मचारी सध्या सर्व्हे करत असल्याचे शेतकरी सांगतात. या सर्व्हेक्षणात ज्यांच्या जागा बाधित होत आहेत त्यांची आर्थिक स्थिती, जागा, घर यासह विविध विषयांची माहिती भरून घेतली जात आहे. दरम्यान नुकतेच प्रकल्प संचालक संतोष देसाई यांनी ही  सोलापूर जिल्ह्यातील 14 हजार 642 शेतकर्‍यांच्या जमिनीचे संपादन या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी केले जाणार असल्याचे सांगितले आहे. तसेच याबाबतची सविस्तर यादी ही आली होती.
दरम्यान या मार्गा शेतकरी आता मोबदल्याबाबत उत्सुक असून याबाबत धोंडेवाडी येथील माजी सरपंच प्रकाश देठे यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, आम्ही जेंव्हा जागेच्या मोबदल्याची विचारणा केली तेंव्हा आम्हाला रेडी रेकनरच्या पाचपट रक्कम देण्यात येईल असे सांगितले. याचा हिशोब केला असता बारा हजार रूपये गुंठा हा रेडीरेकनर दर असेल तर साठ हजार रूपये मिळू शकतात तर एकराला 24 लाखाच्या आसपास. मात्र सध्याची धोंडेवाडी, केसकरवाडी परिसरातील शेतीची किंमत जर पाहिली तर एवढाच दर मिळत आहे. मुळात रेल्वेला जागा देवून जागांची फोड होणार आहे. काही जागा या बाजूला काही जागा त्या बाजूला शिल्लक राहिल. तसेच खूप समस्या शेतकर्‍यांना भेडसावणार आहेत. हा बागायती तसेच फळबागांचा भाग आहे. राष्ट्रीय महामार्गाला जागा या भागातील शेतकर्‍यांनी दिल्या आहेत. त्यांचा मोबदला यापेक्षा जास्त आहे. पुढील काळात रेल्वे धावेल तेंव्हा याचा परिणाम शेजारच्या शेतीवर किती व कसा होणार? याचा विचार झाला पाहिजे. यासाठी चांगला दर बाधित शेतकर्‍यांना मिळावा तो किमान पाच ते सह लाख रूपये गुंठे अथवा याहून अधिक मिळणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही  बाधित शेतकरी संघर्ष समितीही तयार करत आहोत. ज्यात माळशिस, पंढरपूर, मोहोळ, उत्तर व दक्षिण सोलापूर यासह अक्कलकोट तालुक्यातील शेतकर्‍यांना बरोबर घेतले जाईल.
दरम्यान भाळवणीचे माजी सरपंच असणारे व केसकरवाडीचे शेतकरी धोंडिराम शिंदे यांनीही योग्य मोबदला केंद्र सरकारने शेतकर्‍यांना दिला पाहिजे अशी मागणी केली आहे. विकासाला आमचा विरोध नाही परंतु शेतकर्‍यांचा विचार व्हावा. कारण जमीन गेल्यावर आमच्या उदरनिर्वाहाचा ही प्रश्‍न आहे. अशीच भूमिका शेतकरी चंद्रकांत निकम यांनीही मांडली.
शासनाचे वेगवेगळे विभाग शेती, बांधलेली घर, नॉन अग्रिकल्चर प्लॉट, विहीर , बागा, झाडं यासह पाइपलाइन याची पाहणी करून दर ठरविणार आहेत. दरम्यान मुंबई- हैद्राबाद बुलेट ट्रेन हा महत्वकांक्षी प्रकल्प असून तो राबविला जाणारच आहे. याची तयारी मोठ्या प्रमाणात सुरू आहेे. यावर पुणे जिल्ह्यातील शेतकर्‍यांचेही लक्ष असून मध्यंतरी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले आहे. पुण्यात याबाबत बैठक ही घेण्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, विधानपरिषद आमदार प्रशांत परिचारक, रणजितसिंह मोहिते पाटील, विधानसभेचे आमदार शहाजीबापू पाटील, समाधान आवताडे, राम सातपुते, यशवंत माने व अन्य लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालण्याची मागणी या भागातील शेतकरी करत आहेत.
721 किलोमीटर लांबीचा असणारा  मुंबई- हैदराबाद बुलेट ट्रेनचा मार्ग सोलापूर जिल्ह्यात  माळशिरस, पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट या सहा तालुक्यातील 62 गावांतून जाणार असून याबाबत सध्या उत्तर सोलापूर व अक्कलकोट तालुक्यात सामाजिक सर्वेक्षणास सुरुवात करण्यात आली आहे.
 बुलेट ट्रेन जिल्ह्यातील सहा तालुक्यातील 62 गावांतून जाणार आहे. यासाठी 17.5 मीटर रुंद जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे.
बुलेट ट्रेनचा मार्ग जाणार्या तालुक्यातील गावांची नावे माळशिरस :भांबुर्डे, पळसमंडळ, तिरवंडी, चाकोरे, कोंडबावी, बागेचीवाडी, गिरझणी, चोंडेश्‍वरवाडी, दत्तनगर, वेळापूर, उघडेवाडी, धानोरे, तोंडले.  एकूण गावे 13
पंढरपूर: शेंडगेवाडी, केसकरवाडी, धोंडेवाडी, सुपली, भंडीशेगाव, उपरी, गादेगाव, कोर्टी, टाकळी, कासेगाव, गोपाळपूर, अनवली, कोंढारकी, रांजणी, आंबे, सरकोली, सवतगव्हाण, पुळूजवाडी.  एकूण 18
मोहोळ: वडदेगाव, कोथाळे, सोहाळे, वाघोली, कुरूल, कामती बुद्रूक, लमाण तांडा, कामती खुर्द, शिंगोली, तरटगाव. एकूण गावे 10
उत्तर सोलापूर: तिर्हे, पाथरी, बेलाटी, कवठे, सलगर वाडी, प्रतापनगर, सोरेगाव, कुमठे.  एकूण गावे 8
दक्षिण सोलापूर :सावतखेड, होटगी, हणमगाव, वळसंग. एकूण गावे 4
 अक्कलकोट :कर्जाळ, कोन्हाळी, हसापूर, अक्कलकोट (ग्रामीण), ममदाबाद, निमगाव,हत्तीकणबस, चिक्केहळ्ळी, सलगर या गावांचा समावेश आहे. एकूण गावे 9.

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close