Uncategorizedविशेष


पंढरपूरमध्ये यापूर्वी राबविलेल्या आराखड्यांचे ऑडिट करा, आता वाराणसीच्या धर्तीवर विकास होणार

पंढरपूर, – तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या विकासासाठी आता वाराणसीच्या धर्तीवर आराखडा तयार करून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. यासाठी अधिकार्‍यांचा दौराही झाला व आता बैठकांचा सपाटा सुरू झाला आहे. दरम्यान यापूर्वीही वारकरी व पंढरपूरकरांच्या सोयी-सुविधांसाठी अनेक आराखडे व योजना तयार करण्यात आल्या आहेत. या कामांची प्रगती व उपयुक्तता याचे ऑडिट होणे गरजेचे आहे. नाहीतर आणखी एका आराखड्याची पंढरपूरच्या नावावर केवळ नोंद होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व वारकरी संप्रदायाचे भावनिक नाते आहे. त्यांनी या तीर्थक्षेत्राचा विकास आपला मतदारसंघ असणार्‍या वाराणसीच्या धर्तीवर करण्याचा निश्‍चय केला आहे. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वीच पालखी मार्ग व पंढरपूरला जोडणारे रस्ते राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जाचे केले आहेत. आणखी काम सुरू आहेत. आता पंढरपूरच्या विकासासाठी प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी  अनेक आराखडे तयार झाले. काही योजना मार्गी लागल्या मात्र आजही पंढरीचा बकालपणा आहे तसाच आहे. आता या वाराणसीच्या धर्तीवरील आराखडा  व योजनांमुळे या शहराचा कायापालट होईल अशी चर्चा आहे. यासाठी निधीची कमतरता भासणार नाही.
पंढरपूरचा विकास व्हावा, वारकर्‍यांना सोयी- सुविधा मिळाव्यात तसेच पंढरपूरवासीयांनाही या योजनांचा उपयोग व्हावा यासाठी अनेकदा प्रयत्न झाले. शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी तीर्थक्षेत्र विकासासाठी पहिल्यांदा पंढरपूरचे प्रमुख मार्ग व भुयारी गटार योजना तयार करण्यास मान्यता दिली. यानंतर येणार्‍या प्रत्येक सरकारने काही ना काही पंढरपूरसाठी दिले आहे. राज्यात सन 2000 मध्ये आघाडी सरकार आले तेंव्हा पंढरपूर- आळंदी व पंढरपूर- देहू या पालखीमार्गांचा विकास करण्याचा निर्णय झाला. तेंव्हा बांधकाम मंत्री असणार्‍या विजयसिंह मोहिते पाटील यांनी यासाठी खूप प्रयत्न केले.
स्व. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना ते पंढरपूरला धनगर समाज मेळाव्याला आले असता त्यांनी पालखी तळ विकासाची मुहूर्तमेढ रोवली होती. तसेच तत्कालीन खासदार व सध्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आग्रहास्तव येथे तत्कालीन पर्यटनमंत्री जगमोहन यांनी भेट दिली व येथे दर्शन रांगेत भाविकांसाठी इमारत बांधून दिली. आज गोपाळपूर रस्त्यावरील त्याच साडेतीन कोटी रूपयांच्या इमारतीची दुर्दशा झाली आहे.
जिल्ह्याचे सुपूत्र असणारे सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री झाले तेंव्हा त्यांनी  पंढरपूरसाठी खास बाब म्हणून तातडीने अंबाबाई मंदिराजवळ चंद्रभागेवर पाणी पुरवठ्याचा बंधारा, घाट बांधणीसाठी निधी दिला. पुढे ते केंद्रात ऊर्जामंत्री झाले तेंव्हा त्यांनी वाराणसीच्याच धर्तीवर पंढरपूर शहरातील सर्व वीज तारा या भुयारी मार्गे नेण्याची योजना तयार करून निधी दिला होता.
पंढरपूर शहराच्या विकासासाठी स्व.विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी जगत्गुरू संत तुकाराम महाराजांच्या चौजन्मशताब्दीनिमित्त आराखडा तयार करण्याचे आदेश दिले. देहू, आळंदी, पंढरपूरसह नेवासा व भंडारा डोंगराचा विकास करण्याचे यात प्रयोजन होते. हळूहळू यात पालखी मार्गावरील सोयी सुविधांचा समावेश झाला. या आराखड्याचा विस्तारच होत गेला. यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हा आराखडा पुढे नेला. मोठ्या प्रमाणात निधी मिळाला. याच काळात पंढरपूर शहर व आजुबाजूच्या दहा किलोमीटर परिसराच्या नियोजनबध्द विकासासाठी प्राधिकरण निर्माण करण्याचा निर्णय घेतला गेला. मात्र याचे काम अत्यंत संथगतीने सुरू राहिले.
पंंढरपूरच्या विकासाबरोबर चंद्रभागा स्वच्छतेला महत्व दिले जावे यासाठी नमामि चंद्रभागा योजना आखली गेली आहे. तिचे काम सुरू आहे पण ते ही अनेक वर्षे झाले हळूहळू होत आहे. शहरात मोठ्या प्रमाणात स्वच्छतागृहाची उभारणी झाली मात्र अन्य प्रकल्प रेंगाळल्याचा नेहमीच आरोप होत आहे. तुकाराम मुंडे हे जिल्हाधिकारी असताना त्यांनी नदी पैलतिरावरील 65 एकरात भक्तिसागर प्रकल्प राबविला. यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले व यामुळेच आज हजारो भाविकांची राहण्याची सोय होत आहे. याच ठिकाणी पाणी, वीज व स्वच्छतागृहांची सोय आहे. याचबरोबर नदीत कायमस्वरूपी पाण्यासाठी त्यांच्याच काळात विक्रमी वेळेत गोपाळपूरजवळ बंधारा बांधला गेला आहे.
पंढरपूर शहर व उपनगरीय भागातील  खराब रस्ते, अस्वच्छता, नदी विकास, घाटांचे अत्यंत संथगतीने होत असलेले काम याकडे ही लक्ष देेणे खूप गरजेचे आहे. आता पंढरपूरमध्ये बाराही महिने भाविकांची गर्दी असते. यामुळे येथील विकास होताना आजुबाजूची जी धार्मिक स्थळ आहेत त्यांचाही विकास झाला तर येथे भाविक जास्त काळ थांबतील व शहराच्या अर्थकारणाला चालना मिळू शकते. केंद्र सरकार पंढरपूरच्या विकासासाठी इच्छुक असल्याचे दिसत आहे. नितीन गडकरी यांनी वाखरी ते पंढरपूर मंदिरापर्यंतचा रस्ता, यावरील उड्डाण पूल यासाठीही निधी दिला आहे. आता वाराणसीच्या धर्तीवर शहराचा विकास करण्यात येणार आहे. हे करत असताना स्थानिकांना विश्‍वासात घेवून प्रशासनाने काम करावे. तसेच यापूर्वी ज्या योजना व आराखडे राबविले आहेत, ते किती उपयुक्त ठरले याचे ऑडिट , अभ्यास केल्यास  याचा फायदा होवू शकतो. 

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close