राजकिय

बारामतीमध्येच राष्ट्रवादीला गुंतविण्याची भाजपाची चाल

लोकसभा निवडणुकीसाठी आणखी अठरा महिने बाकी असताना भारतीय जनता पक्षाने त्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जावून शिंदे -फडणवीस सत्तेत येताच गेल्या काही दिवसांपासून आता भाजपाच्या नेत्यांनी बारामती लोकसभा निवडणूक ताकदीने लढून जिंकण्याचा मानस व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे. यास केंद्रीय नेतृत्वाकडून पाठबळ दिले जात आहे. नवी दिल्लीच्या राजकारणात मोदी- शहांच्या टक्कर देण्यासाठी विरोधकांची एकजूट करण्याचा प्रयत्न करणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना शह देण्यासाठी बारामतीत त्यांना व त्यांच्या पक्षाला गुंतविण्याची ही भाजपाची चाल दिसत आहे.
महाराष्ट्रात अनेक नेत्यांनी आपआपला मतदारसंघ व पसिसर चांगला विकसीत केला आहे. बारामती यापैकी एक असून सर्वच क्षेत्रात येथे काम झाले आहे. या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व शरद पवार, अजित पवार यांनी केले आहे. तर सुप्रिया सुळे या खासदार आहेत. 2019 च्या निवडणुकीत भाजपा व शिवसेनेची निवडणूकपूर्व युती असतानाही पवार यांनी शिवसेनेला बरोबर घेत काँगे्रससोबत महाविकास आघाडी स्थापन केली व सत्तांतर घडविले. यामुळे भाजपाचा प्रचंड जळफळाट झाला होता. यानंतर आता शिवसेनेत फूट पडली व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या साथीने नवीन सरकार राज्यात आले. शिवसेनेची ताकद कमी करण्यात भाजपा यशस्वी ठरले असून पक्षात उभी पडली आहे. आता भाजपाच्या नेत्यांचे लक्ष राष्ट्रवादीकडे आहे. यामुळेच सत्तांतर होताच बारामती लोकसभा निवडणूक ताकदीने लढून जिंकण्याचा इरादा या पक्षाचे नेते व्यक्त करत आहेत.
मध्यंतरी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या महाराष्ट्र दौर्‍यावर असताना हा विषय ऐरणीवर आला होता. इराणी यांनी अमेठीतून निवडणूक लढवित राहुल गांधी यांना पराभूत केले होते. यामुळे  त्यांच्या कार्यक्रमात बारामतीचा विषय निघाला होता. तेंव्हापासूनच याची चर्चा रंगत होती. मात्र आता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीचा दौरा करून या चर्चेस आणखी बळकटी दिली. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण याही काही दौरे बारामतीचे करणार असल्याचे सांगितले जात आहे. बारामती हा राष्ट्रवादीसाठी महत्वाचा मतदारसंघ आहे. येथे जास्त ताकद पणाला लावून शरद पवार व अन्य नेत्यांना मतदारसंघातच गुंतविण्याचा कदाचित हा भाजपाचा प्रयत्न असावा. कारण हा विषय ऐरणीवर येताच अजित पवार असोत की जयंत पाटील यांच्या जोरदार प्रतिक्रिया आल्या आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर येथे भाजपाला कधीही यश मिळालेले नाही. या मतदारसंघाचे शरद पवार यांनी 1984 यानंतर 1991, 1996, 1998, 1999 ,2004 च्या निवडणुकीत प्रतिनिधीत्व केले आहे. तर अजित पवार यांनी 1991 ची निवडणूक लढविली होती. तर सुप्रिया सुळे यांनी 2009 , 2014 व 2019 ची निवडणूक लढवली व विजयी झाल्या आहेत. सुळे यांच्या निवडणुकांचे निकाल जर पाहिले तर 2014 वगळत दोन्ही निवडणुकीत त्यांना मतदान वाढलेले आहे. 2014 ला मोदी लाट असताना महादेव जानकर यांनी येथून सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. यात जानकर यांना 4 लाख 51 हजार मतं मिळाली होती तर सुळे यांना 5 लाख 21 हजार मतं होती. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचे मताधिक्क्य कमी झाले होते. 2009 ला तीन लाख तर 2019 ला दीड लाखाहून अधिक मतांनी विजयी झाल्या होत्या.
बारामती लोकसभा व विधानसभा मतदारसंघ हा नेहमीच राष्ट्रवादीकडे राहिलेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात बारामतीचे महत्व मोठे आहे. हे पाहता आता भाजपा हा मतदारसंघ जिंकण्याची भाषा करू लागला आहे. मागील निवडणुकीतही त्यांनी ताकद लावली होती. मात्र यश आले नाही. मोदी लाटेत 2014 व 2019 मध्ये या मतदारसंघाने पवार यांचीच साथ केली आहे. 2019 ला माढा मतदारसंघ जिंकल्याने भाजपाच्या आशा आता 2024 च्या लोकसभेसाठी बारामतीसाठी पल्लवीत झाल्या असाव्यात असे वाटते.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा IT Act 2000 नुसार गुन्हा आहे.
Close
Close