आगे…आगे.. देखो होता है क्या|पंढरपूरच्या राजकारणात अनेक उलथापालथी !
मागील दोन महिन्यात झालेल्या साखर कारखान्यांच्या निवडणुका व यात लागलेले धक्कादायक निकाल, येथील राजकारणात अभिजित पाटील यांची एंट्री तर राज्यातील सत्तांतराने आमदार समाधान आवताडे यांना मिळालेले बळ तर येथील राजकारणात ताकदीने उतरू पाहणारा परिचारक गट पाहता येत्या काळात अनेक उलाथापालथ येथे पाहावयास मिळणार आहे. भारतीय जनता पक्ष विस्तारण्याच्या भूमिकेत असल्याने फायद्याचे जे असेल त्या पाठीशी आपली ताकद लावणार हे निश्चित आहे.
मागील आठवड्यात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या राज्यभरातील चार खासगी साखर कारखान्यांसह पंढरपूरचे कार्यालय तसेच घरी आयकरच्या धाडी पडल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून येथील राजकारणात आपले स्थान निर्माण करू पाहणार्या पाटील यांच्यावर ही कारवाई झाल्याने विरोधकांना सुरूवातीला आनंदाच्या उकळ्या फुटल्याचे चित्र होते. सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका झाली मात्र नंतर या धाडीत काहीच आढळून आले नाही हे कळल्यावर व अभिजित पाटील हे चार दिवस धाडीला सामोरे जावून लगेचच सक्रिय झाल्याने विरोधकांची कोंडी झाली. यातच भाजपाचे नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी पंढरपूरमध्ये येत पाटील यांच्या पाठीशी आपण असल्याचे जाहीर केल्याने तर अनेकांच्या भुवया उंचावल्या.
मागील दोन महिन्याच्या राजकारणाचा गोषवारा जर पाहिला तर येथे दामाजी कारखान्यात अनपेक्षितपणे आमदार आवताडे यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यांना विरोधकांपेक्षा स्वपक्षीयांकडून जास्त त्रास सहन करावा लागला. प्रशांत परिचारक समर्थकांनी आवताडे विरोधकांना बरोबर घेत कारखान्यात सत्तांतर घडविले. यात भाजपाचे पदाधिकारी सहभागी होते. यामुळे आवताडे नाराज झाले. तर दुसरीकडे विठ्ठल कारखान्यात भालके- काळे व युवराज पाटील या दोन्ही मातब्बर गटांना पराभूत करत अभिजित पाटील यांनी विजय मिळविला. या निवडणुकीत परिचारकांनी आपली ताकद युवराज पाटील गटाच्या पाठीशी लावली होती. यामुळे अभिजित पाटील यांनी निवडणुकीनंतर परिचारकांविरोधात शड्डू ठोकला. कारखाना निवडणुकीनंतर आवताडे व पाटील हे दोन्ही गट परिचारकांच्या विरोधात असल्याचे जाणवत आहे. यानंतर आवताडे यांनीही स्वतंत्र भूमिका पंढरपूर भागात घेतली आहे.
याच बरोबर अनपेक्षितपणे राज्यात सत्तांतर झाले व भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला. यामुळे आ. आवताडे यांच्या प्रलंबित सर्वच मागण्या आता मान्य होत असून पक्ष त्यांना ताकद देत आहे. यामुळे तर आवताडे समर्थक आनंदात आहेत. मंगळवेढ्याची सिंचन योजना मार्गी लागली यासह विविध प्रकल्पांना निधी मिळत आहे. राज्यात भाजपाची सत्ता येणे हा आवताडे यांच्यासाठी शुभशकून ठरला आहे. त्यांच्यापासून आता अंतर ठेवणार्या परिचारक गटाला आता त्यांच्याशी जुळवून घेण्याची कसरत करावी लागणार आहे. तर दुसरीकडे विठ्ठल कारखाना जिंकल्यानंतर येथील राजकारणात आपले स्थान बळकट करू पाहणार्या अभिजित पाटील यांची भाजपाबरोबरची वाढती जवळीक ही परिचारकांसाठी डोकेदुखी ठरू शकते. पाटील हे नाशिक, नांदेड, धाराशिव, बीड व सोलापूर जिल्ह्यात साखर कारखाने चालवत असून त्यांच्या सारखे युवा नेतृत्व भाजपाबरोबर आले तर पक्षासाठी फायद्याचे ठरणार आहे. म्हणूनच आ. प्रवीण दरेकर यांनीही पाटील यांची पाठराखण करत त्यांचे कौतुक केले आहे.
आ. आवताडे व अभिजित पाटील यांच्यात मैत्रीचे संबंध आहेत. आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणात काही नवी समीकरण जुळली व विधानपरिषदेची जागा तर पक्षाने पाटील यांना दिली तर पंढरपूर तालुका जो चार विधानसभा मतदारसंघात विखुरला आहे तेथे पक्ष आणखी विस्तारू शकतो. याबाबतही आगामी काळात विचार होवू शकेल , अशी शक्यता वर्तवली जात आहे. पाटील हे विठ्ठल परिवाराचे नेते तर आहेतच पण सांगोल्यातही कारखाना चालवत आहेत. त्यांच्याकडे तरूण कार्यकर्त्यांची फौज आहे. यामुळे येथील राजकारणातील सततची अस्थिरता संपविण्यासाठी भाजपाचे वरिष्ठ नेते पुढाकार घेण्याची शक्यता आहे.