उजनी धरणाची पाणीस्थिती वजा 20 टक्के
पंढरपूर – सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणार्या उजनी धरणाची पाणीस्थिती वजा 20 टक्के अशी असून मृतसाठ्यातील 10.29 टीएमसी पाण्याचा वापर मागील तेरा दिवसात झाला आहे. अद्यापही नदीत व कालव्यात पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे.
यंदा उजनी धरणातील पाणी झपाट्याने कमी झाले असून गतवर्षी याच काळात धरण उपयुक्त पातळीत होते. मात्र यंदा ते वजा 19.21 टक्के अशा स्थितीत आहे. उन्हाळा हंगामात कॅनॉल सलग सुरूच ठेवल्याने पाण्याचा वापर जास्त प्रमाणात झाला आहे. याचबरोबर वाढता उन्हाळा व यामुळे होणारे बाष्पीभवन, जलाशयकाठावरील उपसा, विविध योजनांमध्ये सोडलेले मुबलक पाणी यामुळे उजनीतील उपयुक्त जलसाठा हा 6 मे रोजी संपला होता. यानंतर आता धरणाचा प्रवास हा मृतसाठ्यात सुरू आहे.
उजनी धरणातून कालव्यात सोडले जात असलेले पाणी हळूहळू कमी करण्याची प्रक्रिया सुरू असून तीन हजार क्युसेकचा विसर्ग कमी करून तो आता 1900 क्युसेकवर आणण्यात आला आहे. तर भीमा सीना जोडकालव्यात ही केवळ 240 क्युसेकने पाणी सोडले जात आहे. 11 मे पासून उजनीतून भीमा नदीत सोलापूरसह अन्य योजनांसाठी पाणी सोडले जात असून हा विसर्ग 20 मे रोजी सायंकाळी 6 हजार क्युसेक इतका होता. पाणी सोलापूरच्या औज बंधार्यात पोहोचले असल्यायने आता नदीतील पाणी विसर्ग कमी करून तो बंद केला जाईल.
उजनी धरणात सध्या एकूण पाणी साठा मृतसाठ्या 53 टीएमसी इतका शिल्लक आहे. सध्या वाढत्या उन्हाळ्यामुळे बाष्पीभवन ही वाढले असून मागील चोवीस तासात 7.78 मिलीमीटर म्हणजे 1.06 दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन नोंदले गेले आहे.