राजकिय

पवारांच्या दौर्‍यानंतर पंढरपूर राष्ट्रवादीतील वाद आणखीच वाढला


सहकार शिरोमणी कारखान्याची निवडणूक बनली कळीचा मुद्दा


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या पंढरपूर दौर्‍यानंतर येथील पक्षाअंतर्गत असणारे वाद कमी होतील, असा अंदाज होता. मात्र सहकार शिरोमणी कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा राष्ट्रवादीतच कलह निर्माण झाल्याचे चित्र आहे. पवार यांनी कारखाना निवडणुकीत हस्तक्षेप करण्यास नकार देवून येथील नेत्यांची ताकद आजमाविण्याचा कदाचित प्रयोग केला असावा, अशी चर्चा आहे.
येणार्‍या लोकसभा व विधानसभा निवडणुका पाहता पंढरपूर विभागात पक्षाला चांगले  नेतृत्व हवे असून शरद पवार व आमदार रोहित पवार यांनी या भागाची जबाबदारी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्याकडे देण्याची तयारी केली आहे. मागील वर्षभरापासून याबाबतची चाचपणी होत होती. आता त्यांच्या नेतृत्वावर विठ्ठल कारखान्यातील कार्यक्रमात शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
येथील विठ्ठल परिवारातील नेते हे कायमच खासदार पवार यांच्या समवेत राहिले आहेत. आताही भगीरथ भालके, कल्याणराव काळे, युवराज पाटील व गणेश पाटील हे प्रमुख नेते राष्ट्रवादीसोबत आहेत. मात्र पवार यांनी अभिजित पाटील यांचा अचानक पक्षप्रवेश घडवून आणत येथील प्रस्थापितांना धक्का दिला आहे. यातच येथे कल्याणराव काळे अध्यक्ष असणार सहकार शिरोमणी कारखान्याची निवडणूक सुरू असून  यात अभिजित पाटील यांनीच काळे यांना आव्हानं दिले आहे. किमान हा वाद तरी पवार येथे मिटवतील, अशी आशा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना होती. मात्र पवार यांनी कारखान्याच्या निवडणुकीत हस्तक्षेप करण्यास नकार देत विठ्ठल कारखान्याप्रमाणे आपली भूमिका स्पष्ट ठेवली आहे.
दरम्यान पवार यांनी येथील विठ्ठल परिवारातील नेत्यांना सोलापूरला बोलावून चर्चा केली व नंतर मुंबईत बैठक बोलावली होती. यात पक्ष मजबुतीकरणावर चर्चा झाली मात्र पंढरपूर भागात कळीचा मुद्दा बनलेल्या कारखाना निवडणूक आणि या राष्ट्रवादीतील नेतेच एकमेकांसमोर उभे ठाकल्याची चर्चा मात्र टाळण्यात आली. दरम्यान या भागाचे राष्ट्रवादीचे निरीक्षक असणार आमदार रोहित पवार यांची भूमिका पाहिली तर अभिजित पाटील यांच्या पाठीशी भक्कम उभे असून ते त्यांना ताकद देत आहेत. तर दुसरीकडे सहकार शिरोमणी कारखाना निवडणुकीत हस्तक्षेप न करता पवार आजोबा व नातू हे येथील नेत्यांची ताकद देखील आजमावू पाहात असावेत ,असे दिसत आहे.
या कारखान्याच्या निवडणुकीत अभिजित पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीतील नेतेच एकवटले आहेत. भगीरथ भालके हे कल्याणराव काळे यांच्यासमवेत दिसत आहेत. बाकी नेते निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यावर येतील, असे दिसत आहे.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close