राज्यावर सलग संकट , आता अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे महाराष्ट्राच्या पूरस्थितीवर लक्ष असून त्यांनी एनडीआरएफची 26 पथके, भारतीय हवाईदलाचे एक सी-17, दोन सी-130 तसेच एक एमआय-17 हेलिकॉप्टर मदतकार्यासाठी पाठविली आहेत. एनडीआरएफच्या सर्वाधिक 4 पथके रत्नागिरी, कोल्हापुरात 3, मुंबई, रायगड, ठाण्यात प्रत्येकी 2, तर सातारा, नागपूर, पालघर, सांगली, पुण्यात प्रत्येकी 1 पथक तैनात आहे. भारतीय लष्करही मदत कार्यासाठी दाखल झाले आहे
मुंबई – महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट मागील सोळा महिन्यांपासून घोंघावत असून यावर मात करण्यासाठी राज्य सरकार व नागरिक सतत प्रयत्न करत आहेत. यातच मागील दोन वर्षात सतत अवकाळी पावसाचा फटका राज्याला बसला असून यातून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही संकट कमी होतात न होताच आता मागील दोन दिवसात कोकण, पश्चिम महाराष्ट्र , मुंबई तसेच विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 129 नागरिकांचा वेगवेगळ्या दुर्घटनेत बळी गेला आहे. गुरुवारी रात्री झालेली अतिवृष्टी व महाबळेश्वर डोंगरमाथ्यावरून आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील तळीये तर पोलादपूर तालुक्यातील केवनाळे व गोवले सुतारवाडी येथे दरड कोसळून सुमारे 48 जणांचा मृत्यू झाला आहे.
तळीये येथे दरडीखाली आणखी काहीजण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. केवनाळे व गोवले सुतारवाडी येथे काही घरे दरडीसोबत वाहत गेली असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. केवनाळे व सुतारवाडी येथे 21 लोक जखमी आहेत. महाड तालुक्यातील तळीये या गावात सायंकाळी दरड कोसळल्यामुळे गावातील घरे दरडीखाली दबली गेली. शुक्रवारी दरडीखालून 38 मृतदेह काढण्यात आले आहेत तर सुमारे 40 जण दरडीखाली अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यात पावसामुळे 27 जण तर कोल्हापुरात पाचजण दगावल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे. त्याचबरोबर गोंदिया, चंद्रपूर यासह अन्य जिल्ह्यातही पावसामुळे अनेकजण मृत्यूमुखी पडले आहेत.
राज्यातील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. ही आपत्ती कोसळलेल्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, असे त्यांनी शोक संदेशात म्हंटले आहे.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या कुटुंबांना 2 लाख रुपये तर जखमींना 50 हजारांची मदत देण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून ट्वीटद्वारे ही माहिती दिली. दरम्यान, महाराष्ट्रातील पूरस्थितीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली. पाऊस आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा शहा यांनी घेतला. तसेच सर्वतोपरी मदतीचे आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांना दिले. मुसळधार पावसामुळे रायगडमध्ये घडलेली घटना दुर्दैवी आहे, असे शहांनी ट्विट करून म्हटले आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून पूरस्थितीची माहिती घेतली आहे.
महाराष्ट्रात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. काही जिल्ह्यांमध्ये पावसाने उसंत घेतली आहे. पण नद्यांना पूर आल्याने धोका अजूनही कायम आहे. अशा गंभीर स्थितीत हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या 6 जिल्ह्यांना पुढील 24 तासांसाठी मुसळधार पावसाचा पुन्हा इशारा दिला आहे. दरम्यान, पुणे विभागातील अनेक नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्यामुळे 84 हजार 454 लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 40 हजार 882 लोकांचा समावेश आहे. तर सांगली जिल्ह्यातील 36 हजारपेक्षा जास्त लोकांना तर सातारा जिल्ह्यातील नदीकाठच्या अनेक कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.