दुर्दैवी घटना : आजीच्या अस्थी विसर्जनाला निघालेल्या नातवासह दोघांचा अपघाती मृत्यू

मंगळवेढा – आजीच्या अस्थी विसर्जनासाठी भीमा नदीकडे मोटारसायकलवरून निघालेल्या नातवास व त्याच्या सहकार्यास एका टेम्पाने जोरदार धडक दिल्याने यात या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
ही घटना मंगळवेढा तालुक्यात घडली असून यात मयत झालेल्यांमध्ये अरविंद मेटकरी (वय 21) व पाठीमागे बसलेले बंडू गोरे (वय 42 रा.नदेश्वर )या दोघांचा समावेश आहे. या प्रकरणी टेम्पोचा चालक मोहसिन (रा. निमशिरगांव जि.कोल्हापूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवेढा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत अरविंद ज्ञानेश्वर मिटकरी यांच्या आजीचा नुकताच मृत्यू झाला होता व त्यांच्या अस्थिंचे विसर्जन करण्यासाठी ते बंडू पांडुरंग गोरे हे एमएच 13 डी.एल. 1177 या मोटार सायकलवरून माचणूर येथील भीमा नदी पात्राकडे 24 जुलै राजी सकाळी 9:30 वाजता जात असताना मंगळवेढा -ब्रह्मपुरी मार्गावरील हजारे मळ्याच्याजवळ समोरून भरधाव वेगाने आलेल्या टेम्पो क्रमांक एम.एच.10 सी.आर.6681 ने या मोटरसायकल चुकीच्या मार्गाने येऊन जोराची धडक दिल्याने हे दोघे जागीच मृत्यूमुखी पडले. याबाबतची फिर्याद सोपान दाजी मेटकरी यांनी दिली असून टेम्पोचालक मोहसीन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेमुळे मंगळवेढा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
