राजकिय

विठ्ठल नंतर दामाजी कारखान्यातही प्रस्थापितांना धक्का ;
भाजपामधील मतभेद उघड, परिचारक व भालके समर्थकात उत्साहपंढरपूर  – श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर मंगळवेढा तालुक्यातील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचा निकाल ही धक्कादायक लागला असून प्रस्थापितांना येथेही पराभूत व्हावे लागले आहे. विद्यमान आमदार असणार्‍या समाधान आवताडे यांच्या पॅनलचा धुव्वा उडाला आहे. येथे भाजपामधील मतभेद दिसून आले आहेत. तर दुसरीकडे माजी आमदार प्रशांत परिचारक गटानेही आवताडे विरोधकांची साथ करत त्यांची राजकीय घौडदौड रोखण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र आहे.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होवून दहा दिवस झाले आहेत. तेथे भगीरथ भालके व कल्याणराव काळे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा पराभव झाला व नव्याने विठ्ठलच्या रणधुमाळीत उतरलेल्या अभिजित पाटील यांनी येथे बाजी मारली. या निवडणुकीत भालके पॅनल तिसर्‍या क्रमांकावर होते. यामुळे सहाजिकच भालके गटात नाराजी होती. मात्र दामाजी कारखान्याच्या निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या. येथे परिचारक , भालके व मंगळवेढ्यातील समाधान आवताडे विरोधकांनी ऐनवेळी समविचारी आघाडी केली व आव्हानं उभे केले. या निवडणुकीपूर्वी परिचारक समर्थकांनी मेळावा घेवून निवडणूक लढविण्याची मागणी केली होती. मात्र आवताडे व परिचारक भारतीय जनता पक्षात काम करत असल्याने ते ऐनवेळी एकत्र येतील अशी शक्यता वाटत होती. मात्र राजकारणाने अनेक वळण या कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने घेतली.
दामाजी कारखान्याच्या या निवडणुकीत भाजपाचे पदाधिकारीच विद्यमान आमदार समाधान आवताडे यांच्या विरोधातील समविचारी आघाडीकडून निवडणूक रिंगणात होते. यात परिचारक समर्थकांचाही समावेश होता. याचबरोबर भगीरथ भालके समर्थक व समाधान आवताडे यांचे स्थानिक राजकारणातील विविध पक्षांमधील विरोधकांनी पॅनलची चांगली मोट बांधली व आ. आवताडे यांना आव्हानं देत त्यांचे पॅनल पराभूत केले. हा निकाल धक्कादायक मानला जात आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने भगीरथ भालके यांच्या समर्थकांना गुलाल खेळण्याची संधी मिळाली आहे. पंढरपूरची पोटनिवडणूक व नंतर विठ्ठल कारखाना रणधुमाळीत भालके यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दामाजी कारखान्यात परिचारक व भालके हे एकत्र आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या गटाने विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत लक्ष घालून तेथे युवराज पाटील गटाला ताकद दिल्याची चर्चा होती. परिचारक समर्थक काही उमेदवार युवराज पाटील यांच्या पॅनलमध्ये दिसत होते. तर मंगळवेढ्यात दामाजी कारखान्यात परिचारकांनी स्वपक्षीय आमदार आवताडे यांना विरोधक करत समविचारी आघाडीची साथ केली आहे. यामुळे भारतीय जनता पक्षामधील मतभेद उघड झाले आहेत. मंगळवेढा तालुक्यातील पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी समाधान आवताडे यांना विरोध केला व निवडणूक लढविली आहे. यामुळे आता आगामी काळात तेथील राजकारणासह पंढरपूरमध्ये याचे पडसाद दिसतील असा अंदाज आहे.
परिचारक गटाने विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पक्षाच्या आदेशानुसार समाधान आवताडे यांचा प्रचार केला व त्यांच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. यामुळे प्रथमच पंढरपूर विधानसभा मतदारसंघात कमळ फुलले होते. मात्र यानंतर परिचारक व आवताडे यांच्यात अंतर निर्माण झाल्याचे सतत जाणवत होते. आता कारखाना निवडणुकीनंतर हे चित्रच स्पष्ट झाले आहे. राज्यात भाजपाचे सरकार सत्तेत आले असताना व आवताडे हे आमदार असूनही त्यांचे पॅनल दामाजी कारखान्याच्या निवडणुकीत पराभूत झाले आहे. या कारखान्याच्या निवडणुकीत अनेक प्रश्‍न गाजले होते.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा IT Act 2000 नुसार गुन्हा आहे.
Close
Close