भीमेची पाणी पातळी खालावली, वाळू माफियांची चांदी.. गृहमंत्र्यांच्या दौर्याआधी होड्या कापून कारवाईची नांदी


पंढरपूर – यंदाही भीमा व नीरा खोर्यात चांगला पाऊस झाल्याने उजनी व वीरमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले गेले असून यामुळे भीमा नदीपात्रात वाळू मोठ्या प्रमाणात आली आहे. इतके दिवस धरणातून विसर्ग सुरू असल्याने वाळू उपसा करताना माफियांना त्रास होत होता. मात्र आता हळूहळू पात्र उघडे पडू लागल्याने वाळूची चोर्या सुरू झाल्या आहेत. दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाळू चोरी रोखण्यासाठी कडक पावले उचण्याचा इशारा नागपूरमध्ये दिला होता. यासाठी त्यांनी अधिकार्यांवर ही कारवाईचे संकेत दिले होते. ते आता पंढरपूरला कार्तिकी एकादशीच्या महापूजेला येत असल्याने प्रशासनाने वाळू चोरीवर कारवाई करत अनेक बोटी कटरच्या सहाय्याने तोडून टाकल्या आहेत.
नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाळू चोरीवर अंकूश ठेवण्यासाठी व्यापक उपाय योजना तसेच वाळू बाबतचे नवीन धोरण आणण्याचे जाहीर केले आहे. तसेच काही कारणास्तव वाळू चोरीवर नियंत्रण न ठेवणार्या संबंधित विभागाच्या अधिकार्यांवर कडक कारवाईचे संकेत दिले होते. अगदी या प्रकरणात अधिकार्यांना तुरूंगात जावे लागेल असा जाहीर इशारा त्यांनी दिला होता.
मागील काही दिवस अतिवृष्टीमुळे नद्यांमध्ये पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने अनेक ठिकाणी वाळू चोरी बंद होती. तर काही ठिकाणी विविध क्लुप्त्या करून माफिया वाळू उपसा करत आहेत. आता उजनीसह वीर मधून ही पाणी सोडणे बंद झाल्याने भीमा, नीरा व अन्य नद्यांच्या काठी वाळू उपसा सुरू होताना दिसत आहे. कालच पंढरपूरच्या महसूल पथकाने अवैध वाळू व वाहतुकीसाठी वापरण्यात येणार्या 11 लाख रूपये किंमतीच्या 11 होड्या कटरच्या सहाय्याने कापून नष्ट केल्या आहेत.
भीमा नदी पात्रातील पंढरपूर, व्होळे चिंचोली, इसबावी,भटुंबरे,शिरढोण हद्दीत लाकडी होड्याव्दारे अवैध वाळू उपसा व वाहतूक केली जाते याची माहिती मिळाल्यावर तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी कारवाईचे आदेश दिले होते. या कारवाईसाठी यांत्रिक बोटी वापरून ही पथक नदीपात्रात गेली होती. दरम्यान होडी चालक अधिकार्यांना पाहून पसार झाले. पंढरपूर तालुक्यासह भीमा नदीकाठी मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होतो हे सर्वश्रृत आहे. मात्र आता गृहमंत्र्यांच्या दौर्याअगोदर कठोर कारवाई करत अकरा लाकडी बोटी कापून टाकण्यात आल्या आहेत.

