शेतकरी व कामगार चळवळीचे भिष्माचार्य गणपतआबा देशमुख निर्वतले, जिल्ह्यावर शोककळा
पंढरपूर – शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते सोलापूर जिल्ह्याच्या राजकारण व सहकारातील भिष्माचार्य म्हणून प्रसिध्द असणारे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी 30 जुलै रात्रौ 9.30 वाजता निधन झाले. ते 95 वर्षाचे होते.
गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्बेत ठिक नसल्याने ते सोलापूरच्या रूग्णालयात उपचार घेत होते. अखेर शुक्रवार त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून शेतकरी कामगार पक्षासाठी हे मोठे नुकसान आहे.
कै.गणपतराव देशमुख हे शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते. हे सांगोला विधानसभा मतदारसंघातून 1962 पासून अनेक दशके विधानसभेत निवडून गेले. दुष्काळी पटट्यात असणार्या सांगोल्याचे प्रतिनिधित्व त्यांनी केले. येथे नीरा, टेंभू, म्हैसाळ यासह उजनीच्या पाण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारण, सहकार व सामाजिक क्षेत्रात त्यांचा दबदबा होता. अनेक वर्षे ते सहकारी संस्थांशी निगडीत राहिले. जिल्हा बँक, दूध संघ यासह भूविकास बँक व अन्य संस्थांचा यात समावेश आहे. राज्यात शेतकरी कामगार पक्षाचा विचार त्यांनी नेहमीच पुढे ठेवला. त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याशी नेहमीच चांगले राहिले.
महाराष्ट्रातील सर्वात वयस्कर आमदार गणपतराव देशमुख आहेत, गणपतराव देशमुख 95 वर्षांचे होते. गणपतराव देशमुख यांनी बाराव्या वेळेस विधानसभा निवडणूक जिंकली आहे.सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून गणपतराव देशमुख शेतकरी कामगार पक्षाकडून बाराव्या वेळेस निवडून आले. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करूणानिधी हे देखील 11 वेळेस विजयी झाले होते.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून 11 व्यांदा त्यांनी विक्रमी विजय मिळविला होता. 2009च्या निवडणुकीत विजय मिळवून, करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते. अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल 54 वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले. 2014 ला त्यांनी विधानसभा निवडणुकीत त्यांनी 94 हजार 374 मते मिळवून शिवसेनेचे शहाजीबापू पाटील यांचा 25 हजार 224 मतांनी पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेसने गणपतराव देशमुख यांच्याविरोधात उमेदवार उभा केला नव्हता. देशमुख हे सांगोल्यात सर्वप्रथम 1962च्या निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर 1972 आणि 1995चा अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत सांगोल्यातील मतदारांनी त्यांनाच भरभरून मते दिली. 2012 मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सभागृहाने तसेच सरकारने त्यांचा गौरव केला होता.
गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकांवरच होते, मात्र 1978 मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापले तेव्हा आणि 1999मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हा, अशा दोन वेळा गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता.2019 ला त्यांनी वयामुळे निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी नातू डॉ. अनिकेत देशमुख यांना संधी दिली मात्र यात डॉ. अनिकेत यांना थोडक्या मतांनी पराभव पत्कारावा लागला होता.
शेतकरी व कामगारांसाठी आयुष्यभर त्यांनी काम केले. सांगोला तालुक्यात सूत गिरण्यांसह विविध संस्थांची उभारणी त्यांनी केली. अत्यंत स्पष्टवक्ते म्हणून ते प्रसिध्द होते. आयुष्यभर त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या ध्येय व धोरणं स्वीकारली व याचा प्रसार केला. आबा या नावाने परिचित होते. मागील काही दिवसांपासून त्यांची तब्बेत ठिक नव्हती. यासाठी त्यांना सोलापूरच्या रूग्णालयात ठेवण्यात आले होते. त्यांचे दोन नातू डॉक्टर आहेत.