सोलापूर जिल्ह्याच्या जडणघडणीत मोठे योगदान देणारे आबा, त्यांच्या निधनाने सोलापूर जिल्हयाची मोठी हानी
पंढरपूर – शेतकरी कामगार पक्षाची ताकद सोलापूर जिल्ह्यात अबाधित ठेवत अन्य राजकीय पक्षाच्या नेत्यांशी मृदू संंबंध राखून गणपतराव देशमुख यांनी येथील सहकार, राजकारण व समाजकारणात मोठे योगदान दिले. त्यांच्या निधनाने सोलापूर जिल्हयाचे मोठे नुकसान झाले आहे.
सांगोला तालुका सारख्या दुष्काळी पट्ट्यात पाणी आणून त्यांनी तेथे हरितक्रांती घडविली. पाण्यासाठी मोठा संघर्ष केला. मोहोळ तालुक्यातील पेनूर येथे आबांचा जन्म 10 ऑगस्ट 1927 ला झाला होता मात्र त्यांनी आपली कर्मभूमी सांगोला तालुका ठेवली. 1962 ला पहिल्यांदा आमदार म्हणून ते विजयी झाले. ज्या काळात त्यांनी राजकारणात भाग घेतला तो शेतकरी कामगार पक्षासाठी सुवर्णकाळ मानला जात होता. कारण 1952 साली शंकरराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली ‘शेकाप’चे 28 आमदार निवडून येण्याचा विक्रम घडला होता. हे यश जरी शेकापला टिकवता आले नाही, तरी देखील आजतागायत रायगडसह सांगोला व मराठवाड्याच्या काही भागात पक्षाचे प्राबल्य आहे. याच पक्षाच्या चिन्हावर माजी आमदार गणपतराव देशमुख यांनी तर सांगोला विधानसभेतून सतत अकरा वेळा निवडून येण्याचा विक्रमही केलेला आहे.
कै. गणपतराव देशमुख यांनी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात जिल्हा परिषद असो की सांगोला तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपले प्राबल्य कायम राखले. नगरपरिषद , पंचायत समिती यासह विविध संस्थांमध्ये शेतकरी कामगार पक्षाने आपली ताकद अबाधित ठेवली आहे.
आबांनी जिल्ह्याच्या व राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना साथ केली. पवार यांनीही कधीच त्यांना अंतर दिले नाही. जोवर आबा विधानसभा लढवित होते तोवर त्यांना पवार यांची साथच मिळाली होती. तर माढा लोकसभेला शरद पवार 2009 मध्ये उभे राहिले तेंव्हा भाई गणपतराव देशमुख यांच्याशी सल्लासमलत करूनच त्यांनी निर्णय घेतला होता व सांगोल्याने ही त्यावेळी पवार यांच्या पाठीशी ताकद उभी केली होती.
भाई गणपतराव देशमुख हे विचारांचे पक्के होते पण त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात विजयसिंह मोहिते पाटील, स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्याबरोबर काम केले. येथे राजकारण आड येवू दिले नाही. जिल्हयातील सर्वच संस्थांच्या प्रगतीमध्ये त्यांचे योगदान आहे. त्यांनी राजकारणाच्या पलिकडची मैत्री जपली. येथील राजकारण व सहकारात जोवर आबा लक्ष घालत होते तोवर सर्व काही आलबेल होते मात्र जुन्या नेत्यांनी वयोमानाप्रमाणे संस्थात येणे कमी केल्यावर नव्या पिढीचे राजकारण यात आले व यानंतर जिल्ह्यातील अनेक संस्था अडचणीत आल्याचे आपण पाहिले आहे.