राज्य

साध्या, सात्विक विचारसरणीचा मापदंड राजकारणात निर्माण करणारे व्यक्तिमत्व हरपले : मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई – राजकारणातील एक साधे आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपले अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगोलाचे माजी आमदार आणि ज्येष्ठ शेकाप नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
सर्वाधिक काळ आणि सातत्याने त्यांनी त्यांच्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राज्य विधिमंडळात केले हे तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे वैशिष्ट्य होतेच, पण त्यापेक्षाही ज्या साध्या आणि उच्च विचारसरणीने त्यांनी त्यांचे जीवन व्यतीत केले ते मला महत्वाचे वाटते असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, आबासाहेबांनी राजकारणामध्ये एक आदर्श निर्माण केला, जो की वर्षानुवर्षे एक मापदंड म्हणून राजकीय विश्‍वात राहील.

सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले : देवेंद्र फडणवीस

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाने सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले आहे. विधानसभेने एक अतिशय चांगला मार्गदर्शक गमावला आहे. माझे त्यांच्याशी अतिशय जवळचे संबंध होते. त्यामुळे त्यांचे जाणे ही माझी वैयक्तिक हानी आहे.
त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात सामान्य माणसासाठी लढाई केली. गरीब, शेतकरी, शेतमजुरांसाठी संघर्ष केला. दुष्काळी भागासाठी कायम संघर्ष केला. ज्यांची भाषणे ऐकून आम्हाला महाराष्ट्र समजला ते गणपतराव देशमुख होते.
इतकी वर्षे राज्य विधानसभेत काम करताना त्यांनी कधीही आपल्या विचारांशी प्रतारणा केली नाही. कधी कोणती तडजोड केली नाही. गणपतराव देशमुख यांच्या भाषणांचा एक वेगळा प्रभाव असायचा. संपूर्ण सभागृह त्यांचे भाषण तन्मयतेने ऐकायचे. ते भाषण म्हणजे एक शिकवण असायची. त्यांनी संघर्ष केलेल्या दुष्काळी भागात आम्ही पाणी पोहोचविले तेव्हा आम्हाला आशीर्वाद देताना त्यांनी मागे-पुढे पाहिले नाही. त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केले. दुसरे गणपतराव देशमुख आता होणे नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे आप्तस्वकीय आणि असंख्य चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांचा मार्गदर्शक दीपस्तंभ ढासळला– उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 30 :- “ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी अर्ध्या शतकाहून अधिकच्या प्रदीर्घ संसदीय कारकिर्दीत ध्येयनिष्ठा, पक्षनिष्ठा कायम जपली. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक चळवळीला सुसंस्कृत चेहरा दिला. राजकारणाला नैतिक अधिष्ठान दिलं. महाराष्ट्राचा पुरोगामी विचार पुढे नेण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांनी महाराष्ट्र विधीमंडळाचा गौरव वाढवला. गणपतराव आबांच्या निधनानं मुल्याधिष्ठित राजकारण करणारा आदर्श लोकप्रतिनिधी हरपला आहे. राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांचा मार्गदर्शक दीपस्तंभ ढासळला आहे. महाराष्ट्रानं सद्गुणी सुपुत्र गमावला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातलं अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून गणपतराव आबा कायम स्मरणात राहतील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे स्मरण करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

महाराष्ट्रानं सद्गगुणी सुपुत्र गमावला

वंचित शोषितांचा आवाज हरपला
शेतकरी कामगार पक्षाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार्‍या गणपतआबांच्या निधनाने पक्षाचे तर नुकसान झालेच आहे पण आमची ही वैयक्तिक हानी झाली आहे. आमच्या वरील पितृतुल्य छाया हरपली आहे. त्यांनी अखेरच्या श्‍वासापर्यंत शेतकरी, कामगार, वंचित, शोषित यांचाच विचार केला व त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केला. त्यांनी पक्षाची ध्येयधोरण शेवटपर्यंत अंमलात आणली. सांगोल्या सारख्या दुष्काळी भागाच्या विकासासाठी आबांनी खूप प्रयत्न केले. आज त्यांच्या जाण्याने केवळ शेतकरी कामगार पक्षाचे नाही तर या पुरोगामी महाराष्ट्राची हानी झाली आहे.

जयंत पाटील शेकाप नेते

विधानसभेच्या विद्यापीठाला आपण मुकलो
भाई गणपतराव देशमुख हे 54 वर्षे आमदार होते व दोनवेळा त्यांनी मंत्रिपद भुषविले. बहुतांश वेळा ते विरोधातच राहिले होते. त्यांना आम्ही विधानसभेचे विद्यापीठ म्हणत. ते बोलायला उठले की सत्ताधारी असोत की विरोधक सारे शांत व्हायचे. कारण त्यांचा अभ्यास इतका होता की ते सहजपणे कोणत्याही प्रश्‍नावर कितीही वेळ बोलू शकत. त्यांनी केले कार्य हे महान असून शोषित व वंचित घटकांसाठी आयुष्य वेचले. अशा या महान नेत्याच्या जाण्याने राज्याचे नुकसान झाले आहे.
पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री

अभ्यासू नेता हरपला
माजी आमदार गणपतराव देशमुख हे अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व होते. त्यांच्या जाण्यामुळे मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. एक लोकाभिमुख, जेष्ठ, तज्ज्ञ आणी राजकारणाच्या सारीपाटावरील अनेक बदल पाहिलेला नेता गेल्यामुळे अत्यंत दुःख होत आहे. साधी राहणी आणि सरळ विचारसरणी यामुळे ते लोकप्रिय होते. सांगोला मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येण्याचा त्यांनी विक्रम केला आहे. परमेश्‍वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हिच भावपूर्ण श्रध्दांजली.

विजयसिंह मोहिते पाटील, माजी उपमुख्यमंत्री

निस्पृह व निष्कलंक नेता हरपला
राज्याच्या राजकारणात जे निस्पृह व निष्कलंक राजकारणी होते यात भाई गणपतराव देशमुख यांचा समावेश होता. त्यांच्या जाण्याने आज वंचित, शोषित, शेतकरी, कामगार चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी माझे काका स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्यासमवेत पन्नास वर्षाहून अधिक काळ केले व सोलापूर जिल्ह्याचा सहकार उभा केला. निरपेक्ष भावनेने आयुष्यभर लोकांची सेवा करणारे आबा निर्वतल्याने सोलापूर जिल्ह्याचे नव्हेतर सार्‍या राज्याचे मोठे नुकसान झाले आहे.
प्रशांत परिचारक आमदार विधानपरिषद

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close