कोरोनाग्रस्त पत्नीस योग्य वेळी उपचार न देता तिचा मृत्यू घडवून आणल्याचा आरोप असणार्या पतीचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला
सोलापूर – पत्नीस कोरोना झाल्याचे समजून तिला योग्य वेळी औषधोपचार न करता जाणीवपूर्वक तिचा मृत्यू घडवून आणल्याचा आरोप पती लिंगराज दामू पवार (रा. तुकाईनगर, मंगळवेढा) यांच्यावर असून याप्रकरणी मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल आहे. यात आरोपीने अटकपूर्व जामीनासाठी पंढरपूरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात अर्ज केला होता तो न्या. कमल बोरा यांनी फेटाळून लावला आहे.
या घटनेची माहिती अशी की, आरोपी लिंगराज याचा विवाह 2005 मध्ये उमा शंकर चव्हाण (रा. सोलापूर) यांची मुलगी अश्विनी हिच्याबरोबर झाला होता. लग्नानंतर अश्विनी हिस मुलगी झाल्याने पती नाराज झाला. त्याने घटस्फोटाची मागणी केली मात्र पत्नीने नकार दिल्याने तिचा त्याने छळ सुरू केला. यानंतर पत्नीस कोरोनाची लागण झाली. परंतु पतीने मुद्दाम तिला उपचारासाठी नेले नाही. नातेवाइकांनी तगादा लावल्याने अखेर मंगळवेढा येथील एका डॉक्टरांकडे नेले असता त्यांनी तिला सोलापूरला नेण्यास सांगितले. तरी टाळाटाळ केली आणि खूप दिवसांनी उपचारासाठी कर्नाटकातील विजापूरला नेले.
तेथील डॉक्टरांनीही पुढील उपचारासाठी बेळगाव येथील दवाखान्यात नेण्यास सांगितले परंतु तोवर खूपच उशिरा झाला होता. तिला बेळगाव येथे नेले असताना तेथे तिचा मृत्यू झाला. मयत अश्विनी हिची आई उमा शंकर चव्हाण यांनी मंगळवेढा पोलिसात याबाबत फिर्याद दिली आहे. आरोपीने अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. सदर जामीन अर्जास प्रखर विरोध करणारे मूळ फिर्यादीचे वकीलपत्र दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी सरकारतर्फे अॅड. सारंग वांगीकर, मूळ फिर्यादीतर्फे अॅड. धनंजय माने, अॅड. जयदीप माने, अॅड. सिध्देश्वर खंडागळे, अॅड. सुहास कदम तर आरोपीतर्फे अॅड. मुल्ला यांनी काम पाहिले.