विशेष

जिल्हा परिषदेतील ठरावामुळे पंढरपूर जिल्हा निर्मितीचा मुद्दा पुन्हा चर्चेत ,राजकीय इच्छाशक्ती अभावी रेंगाळलेला प्रश्न


सोलापूर – सोलापूर जिल्ह्याचे विभाजन स्वतंत्र पंढरपूर जिल्हा निर्मिती करावी व यात सांगोला, माळशिरस, करमाळा, माढा, माण-खटाव तालुक्यांचा समावेश करावा, अशी मागणी अ‍ॅड. सचिन देशमुख यांनी केली. यास जिल्हा परिषदेच्या ऑनलाइन बैठकीत सभागृहाने मान्यता दिली. दरम्यान स्वतंत्र पंढरपूर जिल्ह्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून जोर धरत असली तरी यास शासनस्तरावरून मान्यता मिळणे आवश्यक आहे व यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे.
गुरूवारी जिल्हा परिषदेच्या ऑनलाइन झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली.  माळशिरस, पंढरपूर या तालुक्यांना स्वतंत्र प्रांत कार्यालय आहे. सत्र न्यायालयही आहे. फक्त जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयासाठी येथील लोकांना सोलापूरला जावे लागते. सुमारे दीडशे किलोमीटर अंतरावर ये-जा करणे सर्वसामान्यांना परवडत नाही. त्यामुळे स्वतंत्र पंढरपूर जिल्ह्याची निर्मिती करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली व यास सभागृहाने मान्यता दिली आहे.
मुळात राज्यात अनेक मोठे जिल्हे विभाजनाच्या प्रतीक्षेत आहेत. पुणे ,अहमदनगर यांचा यात समावेश आहे. पंढरपूर जिल्हा निर्मिती करताना माण, खटाव  यासह आटपाडी भागाचा यात समावेश करावा अशी मागणी यापूर्वी ही केली गेली होती. सोलापूरपासून जे तालुके दूर आहेत त्या करमाळा, माळशिरस, सांगोल्यातील जनतेला सोलापूर जाण्यासाठी खूप अंतर पार करावे लागते यासाठी जिल्हा निर्मितीची मागणी केली जात आहे. पंढरपूरचे माजी आमदार कै. पांडुरंगतात्या डिंगरे यांनी ही पंढरपूर जिल्हा निर्मितीची मागणी पुढे केली होती. याच बरोबर 1995 च्या युती शासनाच्या काळात पंढरपूरला मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली होती. त्यावेळीही पंढरपूर जिल्हा निर्मितीची चर्चा होती. मात्र यानंतर हे विषय बाजूला पडले.
जिल्हा निर्मिती करताना निधीचीही खूप मोठी गरज असते. अधिकारी,कर्मचारी व जिल्हा कार्यालय लागतात. राज्यात अनेक जिल्ह्ये हे विभाजनाच्या प्रतीक्षेत आहेत. मध्यंतरी पुण्याचे विभाजन करून स्वतंत्र बारामती जिल्हा तयार केला जाईल अशी ही चर्चा रंगत होती. यात सोलापूर जिल्ह्यातील बारामतीला जवळ असणार्‍या भागाचा यात समावेश असेल ,यावर चर्चा रंगत होत्या. मात्र नंतर या चर्चेतील हवा निघून गेली होती.
पंढरपूर विभाग हा जिल्हा निर्मितीसाठी योग्य आहे. येथे रेल्वे, महामार्ग अशा सुविधा आहेत. पंढरपूर शहराला जोडणारे सर्वच रस्ते सध्या महामार्गाच्या धर्तीवर विकसित झाले आहेत. याच बरोबर येथे जवळपास सर्वच शासकीय कार्यालय आहेत. पंढरपूर हे आजुबाजूच्या जिल्ह्यातील अनेक तालुक्यांसाठी जवळचे ठिकाण आहे. हा कृषिविषयक अग्रेसर तालुका असून येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरामुळे जगभर प्रसिध्द असणारे शहर आहे व प्रतिवर्षी येथे एक ते सव्वा कोटी भाविक येत असतात. येथे जिल्हा कार्यालय होण्यास पोषक स्थिती आहे तसेच औद्योगिकरण ही होवू शकते. जर राजकीय इच्छाशक्ती असेल तर पंढरपूर जिल्हा निर्मितीस काहीच अडचण येवू शकत नाही. 

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close