राजकिय

माढा लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार सोलापूर की सातारा जिल्ह्यातून असणार ? चाचपणी सुरू

विजयसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यामुळे  या पक्षाला माढा लोकसभेत मोठी पोकळी जाणवत असून जो मतदारसंघ बालेकिल्ला होता, तेथे आता उमेदवार ठरविताना खूप चाचपणी करावी लागत आहे. 2019 च्या पराभवामुळे राष्ट्रवादी या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी देणार? याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. या जागेसाठी सातार्‍याचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर यांच्यासह सांगोल्याचेे दीपक साळुंखे पाटील यांची नावे सध्या जरी चर्चेत असली तरी येत्या काळात येथून आणखी नवीन नावे पुढे येण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला मानल्या जाणार्‍या माढ्यात 2019 ला पक्षाला पराभव पत्करावा लागला आहे. या मतदारसंघाने 2014 ला मोदी लाटेत ही मोहिते पाटील यांनी हा मतदारसंघ राखला होता. तर पुनर्रचनेनंतर 2009 ला पहिल्यांदा येथून दस्तुरखुद्द शरद पवार हेच उमेदवार होते व ते मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले होते. 2019 ला शरद पवार यांनी पुन्हा माढ्यातून उभे राहावे अशी मागणी काहींनी केली होती. याची चाचपणी सुरू होती. सांगोल्यात सभा देखील झाली. तेंव्हा विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीतच होते.  मात्र त्यांनी बदलता सूर पाहून निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला जवळ केले. येथेच राष्ट्रवादीची गोची झाली आणि उमेदवार निवडताना खूप दमछाक पाहावयास मिळाली.
2019 ला सुरूवातीला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे आले. त्याचवेळी विजयसिंह मोहिते पाटील यांनाच उमेदवारी दिली जावी, असाही सूर होता. त्याचवेळी मावळ मध्ये शरद पवार यांचे पुतणे व अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांनी उमेदवारीसाठी आग्रह धरला. यामुळे मावळ, बारामती व माढा  या तीन शेजार शेजारच्या मतदारसंघात पवार कुटुंबातील व्यक्तीच उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली. हे पाहता पवार यांनी माढ्यातून न लढण्याचा निर्णय घेतला. येथून तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांना राष्ट्रवादीत आणून उमेदवारी देण्यात आली. तर भाजपाने सातारा जिल्हा काँगे्रसचे तत्कालीन अध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पक्षात घेत उमेदवारी दिली व मोहिते पाटील यांना आपली ताकद त्यांच्या पाठीशी लावण्यास सांगितले.
माढा मतदारसंघ भाजपाने जिंकला असला तरी विधानसभा निवडणुका व स्थानिक स्वराज्य संस्थांचा विचार केला तर येथे अद्यापही राष्ट्रवादी व मित्रपक्षांचा वरचष्मा दिसून येतो. या भागात शरद पवार यांना मानणारे त्यांचे समर्थक जास्त आहेत. 2019 ला माढ्यात पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादीने या मतदारसंघावर जास्त लक्ष केंद्रित न केल्याचे चित्र आहेे. भाजपाची येथे 2024 ची तयारी सुरू झाली आहे. तालुका निहाय बैठका होत आहेत. मात्र राष्ट्रवादीच्या गोटात शांतता दिसत आहे. येथून दीपक साळुंखे यांना उमेदवारी द्यावी, अशी समर्थकांची मागणी आहे.
भाजपाने माढा मतदारसंघाला जोडलेल्या सातारा जिल्ह्यातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली होती. तो प्रयोग यशस्वी ठरला होता. यामुळे आता राष्ट्रवादी येत्या निवडणुकीत कोणाला उमेदवारी देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. यासाठी अनेक नावे आता पुढे येत आहेत. सोलापूर व सातारा जिल्हा हा शरद पवार यांना मानणारा आहे हे आजवर दिसून आले आहे. यामुळे 2019 चा माढ्यातील पराभव राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागला आहे. हे पाहता माढ्यात पुन्हा विजय मिळविण्यासाठी हा पक्ष ही आखणी करत असणारच हे निश्‍चितच.

Header
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close
16:39