परिचारकांशी सलोखा जपत भाजपा वरिष्ठांकडून आ. आवताडे यांचेही केलं जातयं “समाधान”
पंढरपूर- पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात माजी आमदार प्रशांत परिचारक व आमदार समाधान आवताडे यांच्यात दुरावा निर्माण झाला असला तरी पक्षाच्या वरिष्ठांनी परिचारकांशी सलोखा कायम ठेवत आ. आवताडे यांना बळ देण्यास सुरूवात केली आहे. आवताडे यांच्या विजयाने 2021 ला प्रथमच येथे कमळ फुलले असल्याने येथील परिस्थितीवर पक्ष ताक ही फुकूंन पीत असल्याचे दिसत आहे.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ हा प्रथमच भाजपाने 2021 च्या पोटनिवडणुकीत जिंकला होता. यासाठी मंगळवेढा भागातील समाधान आवताडे हे उमेदवार या पक्षाने निवडले होते. स्व. आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे सहानुभूतीची लाट असतानाही राष्ट्रवादीचा पराभव करत आवताडे विजयी झाले. तेंव्हापासूनच पक्षातील वरिष्ठांनी त्यांना ताकद देण्यास सुरूवात केली. सध्या या मतदारसंघात भाजपाचे नेते माजी आमदार प्रशांत परिचारक व आवताडे यांच्यात सख्य नसले तरी पक्षाकडून परिचारकांशी सलोख्याचे संबंध जपत आवताडेंची कामे मार्गी लावली जात आहेत.
2009 ते 2019 या कालावधीत या मतदारसंघात सलग तीनवेळा स्व. भारत भालके यांनी वेगवेगळ्या पक्षांकडून तिकिट घेत विजय मिळविला होता. परिचारक गटाला येथे यश मिळाले नव्हते. 2014 पासून परिचारक भाजपाजवळ आले खरे मात्र राज्यात सत्ता पक्षाची आली तरी पंढरपूरमध्ये पराभवच पत्करावा लागला होता. 2019 ला स्व. सुधाकरपंत परिचारक यांनाही येथे यश मिळवता आले नाही. यामुळेच देवेंद्र फडणवीस व अन्य नेत्यांनी 2021 च्या पोटनिवडणुकीत समाधान आवताडे यांना संधी दिली व प्रथमच मंगळवेढा भागात आमदारकी गेली. परिचारकांनी आवताडे यांची साथ केली खरी मात्र नंतर दोन्ही नेत्यांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे.
आता लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. यातील कामगिरी पाहूनच विधानसभा निवडणुकीच्या तिकिटांचा विचार होणार हे निश्चित आहे. पक्षाने सध्या आवताडे यांना विविध राज्यात निवडणुकांची जबाबदारी देण्याचे धोरण घेतले आहे. पोटनिवडणूक असो की गोवा, तेलंगणा राज्यातील विधानसभा रणधुमाळी आवताडेंनी यांनी पक्षासाठी तेथे जावून काम केले आहे. तर प्रशांत परिचारक यांच्यावर भाजपाने माढा लोकसभेची जबाबदारी दिली आहे. ते या मतदारसंघाचे निरीक्षक व आता निवडणूक प्रचाराचे प्रमुख आहेत. परिचारक माढ्यात तर आवताडे आता लोकसभेला सोलापूर मतदारसंघात भाजपाचे काम पाहणार आहेत.
आवताडे यांना या टर्मला विधानसभेत साडेतीन वर्षे काम करण्याची संधी मिळाली आहे. ते 2021 ला पोटनिवडणुकीत विजयी होवून विधानसभेत पोहोचले आहेत. यामुळे सहाजिकच पक्ष ही त्यांना 2024 च्या विधानसभेला पुन्हा संधी देवू शकतो. यातच त्यांनी आता येथील विकासकामांसाठी निधी खेचून आणत आपल्या कामाची चुणूक दाखविण्यास सुरूवात केली आहे. येथे भाजपामध्येच कामांवरून श्रेयवाद ही रंगत असला तरी आवताडे यांनी संयमी भूमिका घेत पुढील निवडणुकीचा विचार करत कुणालाही न दुखावण्याची भूमिका घेतली आहे. मात्र वरिष्ठ पातळीवरून त्यांना चांगली साथ मिळत असल्याचे चित्र आहे. कामे मंजूर होत असून निधी मिळत आहे.
स्व. भारत भालके हे विधानसभेत अनेक प्रश्नांवर आवाज उठवत असत. त्याच पध्दतीने आता आवताडे यांनी ही अनेक चर्चांमध्ये सहभागी होत आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली आहे. यंदा हिवाळी अधिवेशनात त्यांनी अनेक प्रश्न मांडले व यावर सकारात्मक उत्तर सरकारकडून मिळविली आहेत. या मतदारसंघात साडेचारशे कोटी रूपयांची कामे त्यांनी मंजूर करून घेतली आहेत.