आता काय म्हणावं : अधिकार्यांमध्ये समन्वय नसल्याने सतरा वर्षापासून अनेक शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत
माढा :- सीना माढा योजनेचे काम 2004 मध्ये झाले असून यानंतर 17 वर्षे लोटली परंतु अधिकार्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे प्रकल्पबाधित शेतकर्यांना अद्यापही त्माढा:-याचा मोबदला मिळालेला नाही. प्रलंबित असणार्या या सर्व प्रकरणांचे तातडीने संयुक्त पंचनामे व मूल्यांकन करून शेतकर्यांना भरपाईची रक्कम देण्यात यावी, अशी मागणी आमदार बबनराव शिंदे यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली आहे.
याबाबत बोलताना आमदार शिंदे म्हणाले, गेल्या दोन वर्षांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांच्याकडे मागणी करून निधीची उपलब्धता करून घेतलेली आहे. शेतकर्यांच्या भूसंपादन कामासाठी पैसा कमी पडू दिला जाणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली असल्याने शेतकर्यांच्य भूसंपादनाचे पैसे त्यांना मिळावेत यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सीना माढा योजनेच्या कॅनॉलची कामे केलेल्या निमगाव बादलेवाडी, पिंपळनेर, शेडशिंगे, लऊळ, उजनी, चिंचोली, होळे, भेंड, अरण, वरवडे, जाधववाडी, बैरागवाडी यासह अनेक गावातील शेतकर्यांनी सुरुवातीच्या काळात प्रकल्पासाठी आपल्या जमिनी दिल्या. त्यावेळी कामे सुरु होण्यासाठी सर्वांनी मदत केली. आता जमिनीचा मोबदला देण्याची मागणी केली असता संयुक्त पंचनामे केले जात नाहीत तर दुसरीकडे पंचनामे झालेल्या लोकांचे मूल्यांकन होत नाही. मोजणी करण्यासाठी अपुरा कर्मचारी वर्ग आहे अशी विविध कारणे यामागे आहेत.
यासाठी आमदार बबनराव शिंदे हे वेळोवेळी शासनस्तरावर जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठका घेऊन पाठपुरावा करत आहेत.परंतु जलसंपदा ,महसूल, कृषी विभागातील अधिकार्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे त्याचा फटका मात्र गोरगरीब शेतकर्यांना बसत आहे.
..तर शेतकरी आंदोलन करतील
सीना माढा व आष्टी उपसा सिंचन योजनेतील माढा तालुक्यातील संपादित झालेल्या जमिनींचा शेतकर्यांना मोबदला देण्यासाठी व इतर असणार्या अडीअडचणीबाबत बुधवार 4 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठक आयोजित केली असून यामध्ये शेतकर्यांच्या प्रश्नावर तोडगा न निघाल्यास प्रशासनाच्या विरोधात शेतकर्यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
आमदार बबनदादा शिंदे