राज्य

ऊस उत्पादकाच्या न्याय हक्कासाठी आता “मनसे” रिंगणात, सोमवारी होणार पहिली ऊस परिषद

पंढरपूर – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे मनसेच्या पहिल्या ऊस परिषदेचे आयोजन सोमवार २५ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे, अशी माहिती मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी या ऊस परिषदेचे मनसेच्या वतीने आयोजन करण्यात आले असून यास शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन धोत्रे व प्रदेश सरचिटणीस संतोष नागरगोजे यांनी केले.
शुगर कंट्रोल ॲक्ट 1966 नुसार ऊस घातल्यानंतर 14 दिवसाच्या आत एक रकमी एफआरपी शेतकऱ्यांना देणे बंधनकारक असतानाही याचे तुकडे करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक करण्याचा घाट केंद्र व राज्य सरकारने घातला आहे. याचा जाहीर निषेध करून हा निर्णय कसल्याही परिस्थितीत होऊ न देण्याचा निर्धार करण्यासाठी व कारखानदारांकडून ऊस उत्पादक शेतकर्‍यांची होणारी लूट थांबविण्यासाठी ही ऊस परिषद होत असल्याचे दिलीप धोत्रे यांनी सांगितले.

साखर कारखानदारांच्या संघानी केंद्र सरकारच्या नीती आयोगाकडे एक रकमी FRP परवडत नाही त्यामुळे याचे तुकडे करून ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांना देण्याची परवानगी मिळावी ही मागणी केली होती. आयोगाने या मागणीची दखल घेऊन रमेशचंद्रन समिती नेमली आणि अहवाल तयार करण्यास सांगितले. रमेशचंद्रन समितीने अहवाल देण्यापूर्वी फक्त साखर कारखानदार आणि बरोबर तीन बैठका घेतल्या व कृषिमूल्य आयोगाचा अहवाल मागितला. कृषिमूल्य आयोगाने FRP चे तुकडे करण्याची शिफारस नीती आयोगाकडे केली. त्यानंतर आयोगाने राज्यशासनाला पत्र पाठवले व यात आयोगाने कारखान्याला ऊस घातल्यानंतर 60 % रक्कम 14 दिवसाच्या आत दुसरा हप्ता 20 % रक्कम पुढील 14 दिवसात व तिसरा हप्ता 20 % रक्कम पुढील 2 महिने किंवा साखर विक्री झाल्याबरोबर असे सुचवले होते. या संदर्भात राज्यसरकारचे मत मागवले होते. परंतु ऊस उत्पादकांचे मत विचारात न घेता सर्व साखर कारखानदार , वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ,सहकारी साखर कारखाना संघ यांचे मत विचारात घेतले व त्यानुसार तीन टप्प्यात एफआरपीला हिरवा कंदील दिला आहे. हा निर्णय शासनाला रद्द करायला भाग पाडण्यासाठी या ऊस परिषदेचे आयोजन मनसेच्या वतीने करण्यात आले आहे, असे धोत्रे म्हणाले.

या ऊसपरिषदेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून मनसेचे नेते दिलीप धोत्रे , सरचिटणीस संतोष नागरगोजे , प्रकाश महाजन ,प्रदेश उपाध्यक्ष अशोक तावरे ,अरुण कुलकर्णी, प्रदेश उपाध्यक्ष सुमित खांबेकर , उपाध्यक्ष बालाजी मुंडे हे उपस्थित राहणार आहेत.

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा IT Act 2000 नुसार गुन्हा आहे.
Close
Close