अनलॉकचा ग्रामीणला दिलासा, निर्बंध हटविल्याने व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण
पंढरपूर– कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शहरापाठोपाठ आता ग्रामीण भागातीलही निर्बंध आज (शुक्रवार) पासून हटविण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गुरुवारी रात्री उशिरा आदेश काढून दुकाने रात्री 11 तर हॉटेल व रेस्टॉरंट रात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे. गेले अनेक महिने कोरोनामुळे सतत निर्बंध होते व यामुळे व्यापारी वर्गाचे अर्थकारण मेटाकुटीला आले होते. मात्र आता सारे अनलॉक होत आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव शहरापेक्षा जास्त काळ दिसत होता. त्यात
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव शहरापेक्षा जास्त काळ दिसत होता. त्यातल्या त्यात पंढरपूरसह माढा, करमाळा, सांगोला ,माढा व माळशिरस या पाच तालुक्यात हा संसर्ग अनेक दिवस वाढताच होता. यामुळे या पाच तालुक्यांवर जादा निर्बंध लादण्यात आले होते. मात्र आता हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होवू लागला आहे. यामुळे अनलॉक सुरू झाले आहे.
राज्यात सिनेमा व नाट्यगृह उघडण्यास ही आजपासून परवानगी असून पन्नास टक्के क्षमतेने ती सुरू करण्यात येत आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने यापूर्वीच निर्बंध हटविण्याचे निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार शहरात गुरुवारपासूनच निर्बंध हटवून सर्व व्यवहार सुरळीत सुरू ठेवण्यास महापालिका आयुक्तांनी ग्रीन सिग्नल दिला होता. शहर व ग्रामीण भागात दिवाळीच्या तोंडावर दुकानांची वेळ वाढवून देण्याची मागणी व्यापारी संघटनांनी केली होती. शहरातील निर्णय एक दिवस अगोदर तर ग्रामीण भागातील निर्णय एक दिवस उशिराने घेण्यात आला आहे. या निर्णयाचे विविध व्यापारी संघटना व हॉटेल तसेच ढाबेचालक, लहान व्यावसायिक यांनी स्वागत केले आहे. कोरोनामुळे सर्वच जनजीवन विस्कळीत झाले होते. आता रुग्णसंख्या घटत चालल्याने जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे निर्बंध हटविण्यात आले आहेत. नाट्यगृहे व चित्रपटगृहे सुरू करण्याबरोबरच खुल्या मैदानावरील कार्यक्रम घेण्यासही आता कोणतीही बंधने असणार नाहीत. निर्बंध हटविले असले तरी शासनाने घालून दिलेल्या कोरोनाविषयक मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करणे प्रत्येकाला बंधनकारक आहे, असेही आदेशात स्पष्ट केले आहे. लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण केलेल्यांनाच मुभा राहणार असून उर्वरित नागरिकांनीही लवकरात लवकर लसीचे दोन्ही डोस घ्यावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, निर्बंध हटविण्यात आल्याने मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला आता गती मिळेल, असा विश्वास व्यापारी, उद्योजकांनी व्यक्त केला आहे.