खर्चात शिंदे, परिचारक, राऊत हे आमदार जिल्ह्यात आघाडीवर

सोलापूर – चालू 2021-22 या आर्थिक वर्षात विविध विकासकामांवर आमदार निधी खर्च करण्यात शहर मध्यच्या प्रणिती शिंदे, करमाळ्याचे संजयमामा शिंदे, बार्शीचे राजेंद्र राऊत आणि प्रशांत परिचारक हे आमदार आघाडीवर आहेत. या चारही आमदारांनी मतदारसंघात विविध विकासकामांसाठी प्रत्येकी दीड कोटी रूपये खर्च केला आहे.
यानंतर निधी खर्चात माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे हे दुसर्या तर अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी हे तिसर्या स्थानी आहेत. बबनदादांनी 1 कोटी 46 लाख 96 हजार तर कल्याणशेट्टी यांनी 1 कोटी 41 लाख 83 हजार रुपये खर्च केले आहेत.
मतदारसंघातील ग्रामीण व शहरी भागासाठी विविध विकासकामांकरिता राज्य शासनाकडून आमदारांना दरवर्षी तीन कोटींचा विकासनिधी दिला जातो. आता चालू वर्षापासून यात एक कोटी वाढीव मिळणार आहेत. त्यामुळे आमदारांना विकासकामांसाठी वर्षाला एकूण चार कोटींचा निधी मिळणार आहे. यातून रस्ते, पाणीपुरवठा यासारखी मूलभूत व नागरी सोयीसुविधांची कामे करण्यात येतात.बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत हे गेल्या वर्षीही निधी खर्चात नंबर एकवरच होते. आताही ते टॉपवरच आहेत. विविध प्रकारच्या 35 कामांवर त्यांनी 1 कोटी 50 लाख खर्च केले आहेत. त्यांच्याबरोबरच शहर मध्यच्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी 46 कामांवर 1 कोटी 50 लाख, करमाळ्याचे अपक्ष आमदार संजयमामा शिंदे यांनी 58 कामांवर 1 कोटी 50 लाख आणि विधानपरिषद सदस्य प्रशांत परिचारक यांनी 167 कामांवर 1 कोटी 50 लाख खर्च करून बाजी मारली आहे. यापाठोपाठ विधानपरिषदेचे भाजप आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी शंभर कामांवर 1 कोटी 29 लाख 45 हजार, सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांनी 51 कामावर 1 कोटी 24 लाख 14 हजार, माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते यांनी 73 कामे करून 1 कोटी 6 लाख 73 हजार तर शहर उत्तरचे भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी 4 कामावर 1 कोटी 6 लाख 28 हजार खर्च केले आहेत. मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांनी 5 कामे करून त्यावर 85 लाख 63 हजार, सोलापूर दक्षिणचे भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी 29 कामावर 80 लाख 50 हजार खर्च केले आहेत.
