सहकार शिरोमणी, भीमा सुरू मात्र विठ्ठलबाबत अद्यापही अनिश्चितताच

पंढरपूर – पंढरपूर विभागाच्या सहकार व राजकारणात विठ्ठल, भीमा व चंद्रभागा हे तीनही परिवार हातात हात घालून काम करतात. मात्र यंदा साखर कारखाने सुरू करताना सहकार शिरोमणी व भीमा यांनी बाजी मारली असली तरी विठ्ठल बाबत काहीच निर्णय नसल्याने सभासदांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
कै. आमदार भारत भालके यांनी 2009 च्या दरम्यान विधानसभेत विजय मिळविल्यानंतर येथे परिचारक विरोधकांची मोट बांधून पंढरपूर भागात आपली ताकद वाढविली होती. त्यांनी सुरूवातीला विठ्ठल परिवारातील सर्व नेते एकत्र आणले व त्यांना कारखान्यातही स्थान दिले. यापाठोपाठ त्यांनी विठ्ठल परिवाराचे मित्र असणारे व भीमा कारखान्यात परिचारक यांना विरोध करणार्या माजी खासदार धनंजय महाडिक यांच्याशी मैत्री आणखी घट्ट केली व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही त्यांना बरोबर घेतले. विठ्ठल , सहकार शिरोमणी व भीमा हे तीनही कारखाने एकमेकांना मदत करत होते.
मात्र मध्यंतरीच्या काळात ऊस उपलब्धता कमी असल्याने काही कारखाने बंद राहिले यात या नेत्यांच्या कारखान्यांचा समावेश होता. मागील वर्षी महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच भालके यांनी आपली ताकद वापरून विठ्ठलसह भीमा व सहकार शिरोमणी कारखान्याला थकहमी आणली व कारखाने सुरू केले मात्र म्हणावे तसे गाळप झाले नाही.
यातच मागील वर्षी भारत भालके यांचे निधन झाले व आर्थिक संकटात अडकलेल्या या कारखान्यांना यंदाच्या हंगामात सुरू करताना खूप अडचणीचा सामना करावा लागत आहे. कल्याणराव काळे यांच्या सहकार शिरोमणी कारखान्याला राज्य शासनाने तातडीने थकहमी दिली व त्यांचा प्रश्न मिटविला. दरम्यान महाडिक यांच्या भीमा कारखान्यात ही आता हंगाम सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली असून बॉयलर अग्निप्रदीपन झाले आहे. मात्र विठ्ठल कारखाना अद्यापही वित्तीय संस्थांकडून मदतीच्या प्रतीक्षेत आहे. विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर या कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भारत भालके हे कोणाच्या ही फारसे संपर्कात नाहीत. यातच संचालक मंडळामध्ये वाद निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा कारखाना सुरू व्हावा म्हणून प्रयत्न केले मात्र त्यांनाही यात यश न मिळाल्याचे चित्र आहे. आता या भागातील बहुतांश कारखाने सुरू झाले आहेत मात्र विठ्ठल सहकारी सुरू करण्याबाबत अद्यापही काही हालचाली नाहीत.
मागील हंगामातील शेतकर्यांची तीस कोटी रूपयांची एफआरपीची रक्कम हा कारखाना देणे असून सभासद ही आता पैशासाठी तगादा लावू लागाले आहेत. काही शेतकर्यांनी कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके यांच्या सरकोली येथील निवासस्थानासमोरच आंदोलन सुरू केले आहे.
