सांगोला-मंगळवेढा-सोलापूर नवीन रेल्वे मार्गाची आ. आवताडे यांची रेल्वे राज्यमंत्र्यांकडे मागणी
पंढरपूर – केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने पूर्व -पश्चिम रेल्वे जोडण्यासाठी सांगोला- मंगळवेढा-सोलापूर या ८० किलोमीटर नवीन रेल्वे मार्गास परवानगी द्यावी व याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे भाजपा आमदार समाधान आवताडे यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे.
नवी दिल्ली येथे दानवे यांची आमदार आवताडे यांनी भेट घेतली व याबाबतचे निवेदन दिले. यावेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर उपस्थित होते. सांगोला परिसर डाळिंब तर मंगळवेढा भाग हा ज्वारीसाठी प्रसिद्ध आहे. सांगोला ते सोलापूर हे अंतर केवळ ८० किलोमीटर आहे. मालवाहतूक तसेच शेतामाल ने-आण करण्यासाठी हा रेल्वे मार्ग उपयुक्त असून यास रेल्वे मंत्रालयाने मान्यता द्यावी अशी मागणी आ. आवताडे यांनी केली आहे. तसेच हा नवीन मार्ग झाल्यास पूर्व- पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक अंतर १२०किलोमीटरने कमी होण्यास मदत होईल. यामुळे प्रवाशांचा वेळ व पैसा वाचणार आहे.
या नवीन रेल्वे मार्गामुळे सांगोला व मंगळवेढा सारख्या दुष्काळी पट्ट्याचा तसेच गरीब शेतकऱ्यांचा विकास होवू शकतो व हा भाग विकसित होईल असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यासाठी या मार्गाचे सर्व्हेक्षण व्हावे अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या या भागात राष्ट्रीय महामार्ग वेगाने विकसित होत असून रेल्वे आल्यास या परिसराचा कायापालट होण्यास मदत होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.