राजकिय


वीस वर्षांचे भालके राज संपुष्टात, अभिजित पर्वास सुरूवात


पंढरपूर –  तालुक्यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर  कारखान्यावर मागील वीस वर्षे भालके राज होते ते आता निवडणुकीतील निकालानंतर संंपुष्टात आले असून गुरूवार 21 जुलै रोजी नवीन अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड होत असून या कारखान्यावर सभासदांनी निवडून दिलेल्या अभिजित पाटील गटाची सत्ता आहे. अध्यक्षपदी त्यांची निवड निश्‍चित असून उपाध्यक्षपदी कोणाला संधी मिळणार? याकडे सार्‍यांचे लक्ष आहे.
2002 मध्ये स्व.वसंतराव काळे यांच्या निधनानंतर कारखान्याचे अध्यक्षपद स्व. भारत भालके यांच्याकडे आले होते. तेंव्हापासून ते 2020 नोव्हेंबरपर्यंत त्यांनीच या कारखान्याचे नेतृत्व केले. कोरोनाकाळात त्यांचे निधन झाल्यानंतर डिसेंबर 2020 मध्ये अध्यक्षपदाची धुरा संचालक मंडळाने स्व. आमदार भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांच्याकडे सोपविली होती. आता 2022 च्या निवडणुकीत या कारखान्यावर सत्तांतर झाले असून डीव्हीपी उद्योग समूहाचे प्रमुख अभिजित पाटील यांचे पॅनल विजयी झाले आहे. आज गुरूवारी अध्यक्षपदाची निवड होत असून अभिजित पाटील हेच कारखान्याचे नूतन अध्यक्ष असणार हे निश्‍चित आहे.


2002 ते 2022 या वीस वर्षाच्या काळात भालके कुटुंबातच कारखान्याची सत्ता होती. मावळते अध्यक्ष भगीरथ भालके हे ही गेली दोन टर्म संचालक मंडळात काम करत होते. स्व. वसंतराव काळे यांच्या निधनानंतर तत्कालीन संचालक मंडळाने भारत भालके यांच्यावर विश्‍वास व्यक्त करत अध्यक्षपद त्यांच्याकडे दिले. यानंतर भालके यांनी 18 वर्षे हे पद सांभाळले. त्यांनी 2004 ची विधानसभा लढविली मात्र पराभूत झाले. यानंतरची कारखान्याची  निवडणूक जिंकत कारखान्यावर वर्चस्व कायम राखले. 2009 ला पुनर्रचित पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार झाले आणि विठ्ठल परिवारात जवळपास 29 वर्षानंतर आमदारकी आली. याच काळात स्व. भारत भालके यांनी कल्याणराव काळे, स्व. राजूबापू पाटील , युवराज पाटील यांना बरोबर घेत विठ्ठल परिवार एकसंघ करण्याचा प्रयत्न केला व तो यशस्वी झाला.


यानंतरच्या कारखान्याच्या निवडणुकांमध्ये विठ्ठल परिवारातील सर्व गट एकत्र काम करू लागले. याचा फायदा सहकार शिरोमणी कारखान्याच्या निवडणुकीत काळे यांना झाला. स्व. भारत भालके यांनी 2009, 2014 व 2019 च्या विधानसभा निवडणुका जिंकून आपली ताकद कायम ठेवली. याच काळात कारखान्याचे विस्तारीकरण करण्यात आले होते. मात्र दुष्काळ, कमी गाळप तसेच तांत्रिक कारणांनी अनेक समस्या कारखान्यासमोर उभ्या राहिल्या आणि यानंतर कारखान्याचे आर्थिक गणित चुकू लागले.
दरम्यान 2020 मध्ये कारखान्याच्या कामानिमित्त आमदार भारत भालके हे कोरोनाकाळात ही सतत धावपळ करत होते व याच दरम्यान ते आजारी पडले व यात त्यांचे निधन झाले. यानंतर कारखान्याची धुरा भगीरथ भालके यांच्याकडे देण्यात आली मात्र संचालक मंडळात कुरबुरी सुरू झाल्या होत्या व युवराज पाटील यांनी भालके यांच्यापासून अंतर राखले होते. 2020-21 चा हंगाम अत्यंत कमी चालला तर 2021-22 ला कारखाना सुरू होवू शकला नाही. यानंतर कारखाना निवडणुकीत भगीरथ भालके यांनी कल्याणराव काळे यांना बरोबर घेत विठ्ठल परिवार एकसंध ठेवण्यासाठी युवराज पाटील यांना पाच वर्षे चेअरमनपद देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र तोवर खूप उशिर झाला होता. युवराज पाटील यांनी निवडणुकीची तयारी केली होती. दुसरीकडे राज्यात चार साखर कारखाने चालविणार्‍या अभिजित पाटील हे विठ्ठल कारखान्याचे सभासद असल्याने त्यांनी ही निवडणूक लढविण्याचा चंग बांधला व अत्यंत नियोजनबध्द प्रचार यंत्रणा राबवत आपल्या कामाच्या जोरावर सभासदांसमोर त्यांनी बाजू मांडली. त्यांनी 35 दिवसात सुरू केलेला सांगोला कारखाना व उच्चांकी गाळप व दिलेला दर हे त्यांचे काम विठ्ठल कारखान्याचे सभासद पाहात होते. हे पाहता कारखाना सुरू व्हावा, थकीत ऊसबिल मिळावे व कारखान्याची प्रगती व्हावी यासाठी सभासदांनी त्यांच्या पॅनलला विजयी केले. युवराज पाटील गट दुसर्‍या क्रमांकावर राहिला. वीस वर्षे सत्ताधारी असणार्‍या भगीरथ भालके व काळे गटाला मात्र तिसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.
आता विठ्ठल कारखान्याचे नेतृत्व अभिजित पाटील यांच्याकडे गेले असून त्यांनी पॅनल विजयी झाल्यापासून कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मशिनरी देखभाल दुरूस्ती सुरू असून सात हजार एकर उसाची नोंद घेण्यात आली आहे. शेतकर्‍यांचे व कामगारांची थकीत देणी देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आता कारखान्याचा कारभार रितसर त्यांच्या हाती गुरूवारी आल्यानंतर ते अनेक निर्णय जाहीर करतील हे निश्‍चित.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा IT Act 2000 नुसार गुन्हा आहे.
Close
Close