राज्य

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा “बोजा” व्हाया राष्ट्रवादी राज्य सरकार पेलणार ?


पंढरपूर – पंढरपूर तालुक्याच्या सहकाराचा कणा आणि शेतकर्‍यांचा राजवाडा म्हणून ओळखल्या जणार्‍या गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला वाचवा अशी विनंती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयसिंह देशमुख यांनी नुकतीच प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. मागील दोन तीन वर्षापासून या कारखान्याची स्थिती बरी नाही, कोट्यवधी रूपयांच्या कर्जाचा डोंगर यावर आहे. मात्र राज्य सरकार एका कारखान्याला एवढी मोठी मदत करू शकेल काय? यासाठी राज्यातील अडचणीत आलेल्या सर्वच कारखान्यांचा विचार करावा लागेल असे दिसत आहे.
विधानसभा पोटनिवडणुकीच्या वेळी पंढरपूरमध्ये येणार्‍या सर्वच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला मदत करण्याचे आश्‍वासन दिले होत. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही समावेश होता. जयंत पाटील हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांनीही कारखान्यास मदत करण्याचे सूतोवाच केले होते. आता निवडणूक संपली व पुढील हंगाम जवळ आला तरी कारखान्याची एफआरपी ही पूर्ण न झाल्याने सतत येथे शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत. दरम्यान हा कारखाना आताच अडचणीत आला आहे असे नाही तर मागील काही वर्षांपासून येथे समस्या सुरू आहेत.


2018-19 मध्ये तर विठ्ठल व सहकार शिरोमणी हे दोन्ही कारखाने गळीत हंगाम घेवू शकले नव्हते. 2019-20 मध्ये तत्कालीन आमदार कै. भारत भालके यांनी महाविकास आघाडी सरकारकडून यास परवानगी मिळविली होती व हंगाम घेतला. मात्र यात जास्त काळ कारखाने चालले नाहीत. दरम्यानच्या काळात भारत भालके यांचे निधन झाले व कारखान्याची सूत्रं पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या मध्यस्थीने भगीरथ भालके यांच्याकडे आली आहेत. मात्र कारखान्याची बिल थकल्याने सध्या शेतकर्‍यांमध्ये असंतोष आहे. कारखान्याला राज्य सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. यासाठीच भालके समर्थक असणारे कारखान्याचे  संचालक तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयकुमार देशमुख यांनी जयंत पाटील यांच्या कासेगाव दौर्‍यादरम्यान त्यांना विठ्ठल कारखाना वाचविण्याचे आवाहन केले आहे.
मुळात केवळ विठ्ठलच नव्हे तर आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या कारखान्याची आर्थिक स्थिती इतकी खराब कशी झाली? कर्जाचा डोंगर का वाढला? याचाही शोध घेणे गरजेचे आहे. कारण अशा कारखान्यांना राज्य व केंद्र सरकार मदत करतील ही परंतु सततच त्यांना निधी पुरविणे शक्य होणार नाही व शेतकर्‍यांनी सहकारी तत्वावर उभारलेल्या या संस्था सतत अडचणीत येतील याची भीती आहे.  
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या जवळपस 28 हजार सभासद व कामगार यांचा प्रपंच यावर अवलंबून आहे. सोलापूर जिल्ह्यातील एक चांगला साखर  उद्योग म्हणून याची ओळख होती. सध्या याची गाळप क्षमता ही दहा लाख टनाची आहे. यामुळेच यास आता राज्य सरकारने मदत करावी अशी मागणी वाढत आहे. या कारखान्याने एफआरपीची रक्कम अद्याप पूर्ण केलेली नसल्याने मध्यंतरी आरआरसी ची कारवाई करण्याची नोटीस बजावण्यात आली होती. तसेच यापूर्वी जीएसटी थकविल्याबद्दलही बँक खाती  सील झाली व नंतर  कर भरल्यानंतर ती खुली करण्यात आली होती.

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close