नितीन गडकरींचा महत्वकांक्षी प्रकल्प असणार्या पालखीमार्गाचे भूमिपूजन व लोकापर्ण सोहळ्याची तयारी पूर्ण
पंढरपूर – संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे भूमिपूजन व विविध सहा रस्त्यांचा लोकार्पण सोहळा सोमवार 8 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे उपस्थितीत होणार असून या कार्यक्रमास केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह विविध पन्नासहून अधिक वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी पंढरीत उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आमदार प्रशांत परिचारक व आमदार समाधान आवताडे यांनी दिली.
कार्यक्रमस्थळी रेल्वे मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली असून दहा हजार लोक बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. कडकोट बंदोबस्त शहरात लावण्यात आला आहे. पालखीमार्गाचे भूमिपूजन व काही तयार रस्त्यांचे लोकापर्ण होत असून या योजनेसाठी बारा हजार कोटी रूपयांहून अधिक खर्च होत आहे. या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवाीदीचे अध्यक्ष खासदार शरद पवार ,उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, यांच्यासह पालखी मार्गावरील गावाचे प्रतिनिधीत्व करणारे सर्व खासदार, आमदार यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
आषाढी एकादशीच्या सोहळ्यास पायी येणार्या वारकर्यांसाठी आळंदी ते पंढरपूर व देहू ते पंढरपूर हा रस्ता अत्यंत महत्वाचा आहे. याची दखल घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सदर रस्त्याचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान या कामाचे भूमिपूजन तसेच जिल्ह्यातील इतर पाच राष्ट्रीय महामार्गाचा लोकार्पण सोहळा सोमवारी दुपारी साडेतीन वाजता येथील रेल्वे मैदान येथे होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे याचे भूमिपूजन करणार आहेत. या कार्यक्रमासाठी नितीन गडकरी सोमवारी दुपारी 12 वाजता हेलिकॅप्टरने पंढरीत येणार तेथून थेट श्री विठ्ठल रूक्मिणीचे दर्शनास जाणार आहेत. या नंतर दुपारी 1 वाजता आमदार प्रशांत परिचारक यांच्या पंतनगर येथील निवासस्थानी भोजन करणार असून दुपारी दोन वाजता रेल्वे मैदान येथे विविध 50 महाराज मंडळींशी चर्चा करून त्यांचा सन्मान केला जाणार आहे.
दरम्यान भूमिपूजन होणार्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गा अंतर्गत मोहोळ-वाखरी-खुडूस-धर्मपुरी-लोणंद-दिवेघाट या 220 किमी. रस्त्याचे चौपदीकरणाचा खर्च 6 हजार 693 कोटी असून संत तुकाराम महाराज पालखी मार्गा अंतर्गत पाटस-बारामी-इंदापूर-तोंडले या 130 किमी.साठी 4 हजार 415 कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. तर लोकार्पण होणार्या रस्त्यामध्ये म्हसवड-पिलीव-पंढरपूर, कुर्डूवाडी ते पंढरपूर, सांगोला ते पंढरपूर, टेंभुर्णी ते पंढरपूर व पंढरपूर-मंगळवेढा-उमदी यांचा समावेश आहे. या पाच रस्त्यांसाठी 1 हजार 186 कोटी रूपये खर्च झाला आहे.