विठ्ठल कारखान्याला गतवैभव प्राप्त होईल ; अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी व्यक्त केला विश्वास
पंढरपूर – संचालक मंडळ व कामगारांनी योग्य समन्वय ठेवून चांगले काम केल्यास आपला विठ्ठल कारखाना पुन्हा राज्यात क्रमांक एक वर येईल, असा विश्वास अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी व्यक्त केला. ते वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार व आरोग्य शिबिराच्या कार्यक्रमात बोलत होते.
अभिजीत पाटील यांच्या 39 व्या वाढदिवसानिमित्त कारखाना कार्यस्थळावर नूतन संचालक मंडळाचा सन्मान कामगारांच्यावतीने करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. विठ्ठल कारखान्यातील कर्मचार्यांनी यापूर्वीही प्रामाणिकपणे काम केले आहे. यापुढेही त्यांनी साथ द्यावी आपण गतवैभव संस्थेला प्राप्त करून देवू. येता हंगाम पाहता मशिनरीची देखभाल दुरूस्ती सुरू आहे. कारखाना पूर्ण क्षमतेने चालविण्याचा प्रयत्न आहे. साडेचौदा लाख टन ऊस गाळप होवू शकते. शेतकर्यांच्या उसाला अडीच हजार रूपये प्रतिटन दर देण्यासाठी सर्वांनी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कामगारांचा 31 महिन्याचा पगार व इतर देणी टप्प्या टप्प्याने दिली जातील. ऊसतोडणी व वाहतूक यंत्रणेसाठी वाहन मालकांना दोन लाख रूपयांचा पहिला हप्ता देण्यात आला आहे. नवीन कामगार भरती करताना जुन्या कामगारांच्या अनुभवाचा विचार करून त्यांना बढती देण्यात येईल. कामगारांच्या आरोग्यासाठी येथे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असून प्रत्येक तीन ते सहा महिन्यानंतर हा उपक्रम राबविला जाईल. कामगारांच्या घरातील महिलांसाठी नवीन उद्योगाचा प्रयोग म्हणून शिलाई मशीनचे प्रशिक्षण देवून रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करू,असे अभिजीत पाटील यांनी सांगितले.
यावेळी बोलताना डॉ.बी.पी.रोंगे म्हणाले, कारखाना केवळ अभिजीत पाटील हेच चालवू शकतात. त्यांनी आवाहन केल्याप्रमाणे कामगारांनी साथ दिल्यास कारखान्यास पुन्हा गतवैभव प्राप्त होईल. यावेळी कारखान्याच्या उपाध्यक्षा प्रेमलता रोंगे, संचालक मंडळ, प्रभारी कार्यकारी संचालक डी.आर. गायकवाड, सुधीर धुमाळ यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.