फडणवीस- पाटील नवी दिल्ली दौर्यावर जाण्यापूर्वी चंद्रकांतदादा राज ठाकरेंच्या भेटीला कृष्णकुुंजवर, काय नव समीकरण जमतयं का ?
मुंबई – महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पक्ष आता मोठ्या अलर्ट मोडमध्ये दिसत असून येथील नेते सतत नवीन दिल्लीच्या वार्या करत आहेत. पुढील तीन दिवस माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देशाच्या राजधानीत वरिष्ठ नेत्यांना भेटण्यासाठी जात आहेत. तत्पूर्वी शुक्रवारी चंद्रकांतदादा अचानक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटण्यासाठी त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी पोहोचले. सदिच्छा भेट असल्याचे त्यांनी सांगितले असले तरी जाता जाता त्यांनी उत्तर भारतीयांबाबत ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे माध्यमांशी बोलताना सांगत बरेच काही इशारे केले आहेत.
भाजपा राज्यात शिवसेनेने साथ सोडल्याने मनसेशी चर्चा करत असल्याचे दिसत होते. यापूर्वी ही पाटील हे राज ठाकरे यांना भेटले आहेत. मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद या महापालिका निवडणुकांपूर्वी भाजपा व मनसे एकत्र येतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कारण एका बाजूला महाविकास आघाडीमधील तीनही पक्ष एकत्र लढू असे सांगत आहेत. त्यातल्या त्या राष्ट्रवादी व शिवसेनेत एकोपा दिसत आहे. हे पाहता आता भाजपाने राज ठाकरे यांना बरोबर घेण्याचे ठरविले आहे. मात्र यासाठी मनसे कितपत तयार हे लवकरच समजेल. मनसेची परप्रांतीयांबाबत असलेले धोरण निश्चित असणे यासाठी गरजेचे आहे. भाजपा हा राष्ट्रीय पक्ष आहे व पूर्व, पश्चिम, दक्षिण व उत्तर असा विखुरला आहे. त्यांना महाराष्ट्रात कोणाशीही युती करताना आपल्या सर्व भागातील हितसंबंधाचा विचार करावा लागतो. यातच भाजपा उत्तर भारतात अधिक प्रबळ असल्याने मनसेची मुंबईतील उत्तर भारतीयांबाबतची भूमिका त्यांच्यासाठी महत्वाची आहे. यामुळे ताक ही फुंकून पिले जात आहे.
दरम्यान राज ठाकरे यांची तरूणाईमध्ये असलेली के्रझ व महानगरांमध्ये त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता शिवसेनेला पर्याय म्हणून भाजपा मनसेला आपल्या सोबत घेण्यास इच्छुक आहे. फडणवीस व पाटील हे नवी दिल्लीत पक्षाचे प्रमुख नेते असणारे अध्यक्ष जे.पी.नड्डा तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करणार हे निश्चित असल्याने कदाचित शुक्रवारी चंद्रकांत पाटील हे राज ठाकरे यांच्या भेटीला आले असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कारण बंद दाराआडच्या गोष्टी दोन्ही पक्षांचे नेते जोवर फायनल होणार नाही तोवर उघड करणार नाहीत हे निश्चित.