देश

राज्यात भाजपा सत्तेत आल्याने पंढरपूर – फलटण रेल्वे मार्गाला गती मिळणार



पंढरपूर,- मागील शंभर वर्षा पासून चर्चित असणार्‍या पंढरपूर ते फलटण या रेल्वे मार्गाच्या सर्व्हेक्षणास ऑगस्ट मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यानुसार सदर काम सुरू असून ते पूर्ण होताच या प्रकल्पाला गती देण्याबाबत चर्चा करण्याची ग्वाही केंद्रीय रेल्वे मंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना पत्राव्दारे दिली आहे.

महाविकास आघाडीच्या काळात हा प्रकल्प राज्य सरकारचे सहकार्य नसल्याने रेंगाळला होता. असा सतत आरोप भाजपाकडून होत होता. आता शिंदे- , फडणवीस सरकार आल्याने खा. निंबाळकर यांनी या रेल्वे मार्गासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
याबाबत खासदार निंबाळकर यांनी माहिती दिली आहे. ब्रिटीश काळात पंढरपूर ते फलटण हा रेल्वे मार्ग करण्यासाठी काही प्रमाणात जमीन अधिग्रहण व सर्व्हेक्षण झाले होते. या विषयी निंबाळकर यांनी 1 फेब्रुवारी 2022 रोजी रेल्वे मंत्री वैष्णव यांना पत्र दिले होते. यामध्ये तत्कालीन रेल्वे मंत्री पियुष गोयल व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सदर रेल्वे मार्गासाठी 1 हजार 400 कोटी रूपये देण्याची घोषणा केली होती. लोकसभेच्या प्रचारा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेमध्ये देखील फडणवीस यांनी हे मार्ग करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र राज्यातील विधानसभा निवडणुकी नंतर सरकार बदलले, आणि हे काम ठप्प झाले. विशेष म्हणजे पियुष गोयल यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र पाठवून या मार्गासाठी जागा उपलब्ध करावी व आवश्यक ते सहकार्य करावे अशी विनंती केली होती. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दबावामुळे राज्य सरकारने केंद्राला सहकार्य केले नसल्याचा आरोप निंबाळकर यांनी आपल्या पत्रामध्ये केला आहे.
दरम्यान निंबाळकर यांनी पुन्हा केंद्रीय मंत्र्यांना सदर मार्गाबाबत मागणी केल्यानंतर अश्‍विनी वैष्णव यांनी त्यांना पत्राव्दारे उत्तर दिले आहे. या मार्गाचे सर्व्हेक्षण सुरू असून लवकरच ते पूर्ण होणार आहे. यानंतर पंढरपूर ते फलटण रेल्वे मार्गाला गती देण्यासाठी आपणा बरोबर चर्चा केली जाईल अशी ग्वाही वैष्णव यांनी दिली आहे.
राज्यात पुन्हा भाजपाची सत्ता आल्यामुळे हा मार्ग पुर्ण होण्याच्या आशा वाढल्या आहेत. याचा मोठा फायदा पंढरपूर व परिसरातील नागरिक, व्यापारी यांना होणार आहे.

Header
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close