अजितदादा “पावले” च नाहीत! प्रशासन आषाढीच्या संचारबंदीवर ठाम
पंढरपूर- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी यात्रा काळात पंढरपूर शहरात येणार्या भाविकांना रोखण्यासाठी प्रशासनाने 17 ते 25 जुलै दरम्यान 8 दिवसांची संचारबंदी लागू केली असून यास व्यापारीवर्गाने विरोध केल्याने आमदारद्वय प्रशांत परिचारक व समाधान आवताडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे घातले होते व तीन दिवस संचारबंदी करण्याची मागणी केली होती. मात्र अजितदादा या मागणीसाठी पावले नसल्याचे चित्र असून प्रशासनही पुकारलेल्या संचारबंदीवर ठाम आहे.
गुरूवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे पंढरपूरला आले असता त्यांना व्यापारी महासंघाने निवेदन देवून संचारबंदी कमी करण्याची मागणी केली होती. मात्र यास यश येईल असे एकंदरीत प्रशासनाच्या भूमिकेवर स्पष्ट दिसत आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट, डेल्टा व्हेरियंटचा धोका, यातच सध्याही ग्रामीण भागात सापडत असलेले कोविड रूग्ण पाहता जिल्ह्यात त्रिस्तरीय बंदोबस्त लावून पंढरीत येणार्या भाविकांना रोखण्याशिवाय अन्य पर्याय दिसत नाही.
पंढरपूरमधील लहान मोठे व्यापारी आठ दिवसाच्या संचारबंदीला विरोध करीत असून ते तीन दिवस निर्बंध ठेवावेत अशी मागणी करत आहेत. मात्र शासनाने पायी वारीवरही निर्बंध आणले असून पालखी सोहळ्यांसाठी ही कडक नियम केले आहेत. अशा स्थितीत पंढरीत संचारबंदी कमी करण्याची शक्यता धूसर दिसत आहे.