या दोन सहकारी साखर कारखान्यांना केंद्र सरकारने केली मदत, तातडीने ऊस बिलं देणार !
इंदापूर – कर्मयोगी शंकररावजी पाटील व निरा भिमा सहकारी साखर कारखान्याची ऊस बिले येत्या 20 दिवसात म्हणजे 5 जून पूर्वी ऊस उत्पादक शेतकर्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतील. केंद्र व राज्य सरकारने कारखान्यास सहकार्य केल्याने आता दोन्ही कारखान्यांचा आर्थिक अडचणीचा काळ संपला आहे, अशी माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व निरा भीमाचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी इंदापूर येथे दिली.
कर्मयोगी व निरा भिमा कारखान्याच्या संचालक मंडळांची बैठक पार पडल्यानंतर हर्षवर्धन पाटील व लालासाहेब पवार यांनी पत्रकार पत्रकार परिषद घेतली. या दोन्ही कारखान्यांसमोर गेली दोन-तीन वर्षापासून खेळत्या भांडवला अभावी आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होता. मात्र आता या दोन्ही कारखान्यांना केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने खेळते भांडवल उपलब्ध होणार असल्याने, आर्थिक अडचणीच काळ आता संपला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या कामी सहकार्य लाभल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
प्रत्येक साखर कारखान्यास चढउताराचा काळ हा असतो. आपल्या भागातील अनेक कारखाने यापूर्वी अडचणीत होते, मात्र सध्या त्या कारखान्यांनी गत वैभव प्राप्त केले आहे. आगामी काळात कर्मयोगी व निरा भीमा हे कारखाने गत वैभव प्राप्त करतील, असे त्यांनी ठामपणे सांगितले
कारखान्याने अडचणीत असलेल्या अनेक शेतकर्यांना ऊस बिलापोटी अॅडव्हान्स दिले आहेत. तसेच या दोन्हीं कारखान्यांनी ऊस तोडणी व वाहतुकीची सर्व बिले अदा केली आहेत. गेली 34 वर्षे कर्मयोगी व 22 वर्षे निरा भीमाने शेतकर्यांचा विश्वास संपादन केला आहे. विश्वास हीच आमची शिदोरी आहे. त्यामुळे कर्मयोगीची मालमत्ता तब्बल 600 कोटी व निरा भिमाची रु. 400 कोटींची झाली आहे. आता दोन्ही कारखान्यांना खेळते भांडवल उपलब्ध होणार असल्याने, आगामी गळीत हंगाम हे उत्कृष्टपणे चांगल्या पद्धतीने पार पडतील, असे हर्षवर्धन पाटील व लालासाहेब पवार यांनी सांगितले.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, कर्मयोगी व निरा भीमा कारखान्यास विना परवाना गाळप केल्याबद्दल 22 कोटी दंडाच्या बातम्या आल्या आहेत. या संदर्भातील दंडाच्या नोटिसा हा कामकाजाचा भाग असतो. याची वसुली होत नाही. यासंदर्भात दोन्ही कारखान्यांनी सहकार मंत्र्यांकडे अपील केले आहे. मी सहकार मंत्री असताना प्रत्येक वर्षी असे कोट्यवधी रुपयांचे दंड रद्द केल्याचे पाटील यांनी सांगितले. कारण साखर कारखाने हे शेतकर्यांच्या संस्था आहेत.
यावेळी निरा भीमा कारखान्याचे उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, अँड.कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासाहेब घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, दत्तात्रय पोळ, कमाल जमादार, प्र.कार्यकारी संचालक सुधीर गेंगे पाटील उपस्थित होते.