पंढरपूर : 125 कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेचा प्रश्न लागला मार्गी, लवकरच निविदा निघणार !
पंढरपूर – तीर्थक्षेत्र पंढरपूर शहरातील सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याकरता म्हणून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरुत्थान महाअभियान योजनेअंतर्गत भुयारी गटार योजना आखण्यात आली असून 125 कोटी 76 लाख रुपयांच्या या योजनेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुख्य अभियंता पुणे प्रादेशिक विभागाने 11 मार्च 2024 रोजी तांत्रिक मंजुरी प्रदान केली आहे. दरम्यान या योजनेची निविदा काढण्याची प्रक्रिया आता सुरू होणार असून 18 जून रोजी नगर विकास विभागाने राज्यातील नवरोत्थान महाअभियानातील महापालिका व नगरपरिषदांच्या ज्या योजना मंजूर आहेत तेथील आयुक्त व मुख्याधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यात पंढरपूर नगरपरिषदेचा ही समावेश आहे, अशी माहिती मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली.
18 जून रोजी नगरोत्थान महाअभियान अंतर्गत मुख्य सचिव नगर विकास यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीची बैठक पार पडली. यामध्ये भूसंपादन प्रकल्प, मल:निस्सारण, पर्जन्य जलवाहिनी, पाणीपुरवठा, रस्ते विकास यासारख्या योजना ज्या महापालिका व नगरपरिषदांकरिता मंजूर आहेत त्यांचे मुख्याधिकारी आयुक्त यांना बोलावण्यात आले होते. यामध्ये पंढरपूरचा समावेश होता. नवीन तांत्रिक मान्यता प्राप्त असणारे प्रकल्प यावर यात चर्चा झाली. राज्यात केवळ मलनिस्सारण प्रकल्प जे नव्याने मंजूर झाले आहेत यामध्ये पंढरपूरसह इंदापूर ,मोहोळ, विटा, हिंगणघाट ,निलंगा, इचलकरंजी या नगरपरिषदांचा समावेश आहे.
पंढरपूर शहराची वाढती लोकसंख्या पाहता पंढरपूर शहरांमध्ये भुयारी गटार योजना जी आहे तिची क्षमता वाढवण्याची मागणी होत होती. यासाठी म्हणून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नम्रतान महाअभियान योजनेअंतर्गत 125 कोटी 76 लाख रुपये किमतीच्या योजनेचे अंदाजपत्रक व आराखडे तयार करण्यात आले होते. यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान दोन अंतर्गत 48 कोटी 82 लाख रुपये तर महाराष्ट्र सुवर्ण जयंती नवरोत्थान अभियानांतर्गत 76 कोटी 94 लाख रुपये यांचे दोन प्रस्ताव तयार करण्यात आले होते. तो मंजुरी करता म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठवण्यात आले होते. यातील महाराष्ट्र सुवर्ण जयंती महा अभियान योजनेतील प्रस्तावित बहात्तर कोटी 87 लाख रुपये किमतीच्या आराखड्यास जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मान्यता दिलेली आहे. तसेच स्वच्छ महाराष्ट्र अभियान दोन अंतर्गत 48 कोटी 82 लाख रुपयांचा प्रस्ताव होता. यापैकी 18 कोटी 12 लाख रुपये पंढरपूर नगरपरिषद देणार आहे ,तर उर्वरित 30 कोटी 70 लाख रुपयांच्या योजनेलाही मंजुरी देण्यात आलेली आहे. दरम्यान या योजनेचे संपूर्ण अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे व आता याची निविदा केव्हाही निघू शकते व ही योजना राबवण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
या भुयारी गटार योजनेअंतर्गत शहरातील 13 एमएलडी सांडपाण्याचे व्यवस्थापन केले जाणार आहे. याबाबत बोलताना मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी सांगितले की, ही योजना व्हावी याकरता म्हणून आपणही पाठपुरावा करत होतो. मुंबईत असताना या योजनेच्या बैठकी संदर्भात माहिती मिळाली. या 125 कोटीच्या योजनेला मार्च 2024 मध्येच मान्यता मिळाली असून आता लवकरच याच्या निविदा प्रक्रिया राबवल्या जातील, यामुळे शहरातील सांडपाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.